Onion Export | बांग्लादेशला नाशिकचा लाल कांदा हवा; मात्र याचा शेतकऱ्यांना फायदा आहे..?


तनुजा शिंदे : Onion Export |  ७ डिसेंबरपासून केंद्र सरकारने देशात कांदा निर्यात बंदी लागू केली असून, ही बंदी आता ३१ मार्चपर्यंत कायम असणार आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारवर रोष असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा रोष सरकारला परवडणारा नाही. त्यामुळे अखेर सरकारने कांदा उत्पादकांच्या कलाने निर्णय घेतला असून, कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी काही अटी शर्थीसह दिली असून, यानुसार बांग्लादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीस सरकारने परवानगी दिलेली आहे. तर, ही निर्यात ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोट्र्स’च्या माध्यमातून केली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा झाली असून, अधिसूचना देखील जारी केलेली आहे. (Onion Export)

शेतकऱ्यांना काही फायदा आहे की नाही..?

देशांतर्गत बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने निर्यातबंदी लागू केली होती. यामुळे शहरी भागातील सामान्य नागरिक सुखावले असले तरी शेतकऱ्यांना मात्र मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, आता NCEL मार्फत ५० हजार टन इतक्या कांद्याची निर्यात ही बांग्लादेशमध्ये केली जाणार आहे. केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभाग विदेश व्यापार महासंचालनालयातर्फे गेल्या आठवड्यात शुक्रवारी याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र, या निर्यातीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. तर, यायचा खरंच शेतकऱ्यांना काही फायदा आहे की नाही? हे पाहुयात…

Onion Export Ban | सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल..?; नेमकं प्रकरण काय

Onion Export | बाजार दरावर असा होईल परिणाम

बांग्लादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीच्या परवानगीमुळे कांदा व्यापारी तथा अभ्यासकांच्या मते, निर्यात कमी प्रमाणात होणार असल्यामुळे स्थानिक बाजारावर याचा फार काही होणार नाही. मात्र, तरीही स्थानिक बाजारात कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा होऊ शकते. पण यामुळे बाजारातील सेंटीमेंट हे कसे तयार होईल हे पहावे लागणार आहे. देशभरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमाक झाल्याचे पाहता हा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला असला, तरी केंद्राच्या या निर्णयाचा शेकऱ्यांना फार काही फायदा होणार नसल्याचे सांगितले जात आहे. (Onion Export)

११ मार्चपर्यंत बांग्लादेशला पोहोचविणे आवश्यक

मागील महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी मिळाल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर लगेच दोन दिवसांनी केंद्रीय ग्राहक कल्याण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव रोहितकुमार सिंग यांनी कांद्यावरील निर्यातबंदी ही ३१ मार्चपर्यंत कायम असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी त्यांनी ५०,४०० मेट्रिक टन कांदा बांग्लादेशला निर्यात करणार असल्याचे देखील सांगितले होते. तर, प्रत्यक्षात मात्र केवळ ५० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार असून, हा कांदा रमजानपूर्वी म्हणजेच येत्या ११ मार्चपर्यंत बांग्लादेशला पोहोचविणे आवश्यक आहे.

Onion Export Ban Lift | सरकार शेतकऱ्यांसमोर नमले..! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली.

आठ दिवसांत कांदा बांग्लादेशात पोहोचणार नाही

NCEL हे नाफेडकडून कांदा खरेदी करणार आहे. नाफेडच्या कांदा खरेदीचे अत्यंत वाईट अनुभव आले असून, विश्वासार्हता नसल्याचे नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या कांदा उत्पादक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तथा उत्पादकांनी सांगितले. तसेच एनसीईएलकडे कांदा निर्यातीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा देखील नाही. याशिवाय एनसीईएलला कांदा खरेदी करणे, तो पॅकिंग करणे आणि इतर सर्व बाबी पूर्ण करून हा कांदा आठ दिवसांत बांग्लादेशला पोहोचवणे शक्य नसल्याचेही अधिकारी आणि निर्यातदारांकडून सांगितले जात आहे.

‘नाशिकचा लाल कांदा’ हवा मात्र…

बांग्लादेशमध्ये ११ मार्च पासून सुरू होणाऱ्या रमजान महिन्यापूर्वी म्हणजे ११ मार्चपर्यंत ‘नाशिकचा लाल कांदा’ पाहिजे आहे. मात्र, एनसीईएलला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच कमीत कमी चार दिवस लागणार आहेत. आणि नाशिकमधून बांग्लादेशात कांदा निर्यात करण्यासाठी किमान सात दिवस लागणार आहेत असे एकूण ११ दिवस हे या निर्यातीसाठी लागणार आहेत. दरम्यान, एनसीईएलची आजची परीस्थिती बघता इतक्या कमी वेळात बांगलादेशात कांदा पोहोचण्याबाबत शंकाच आहे.