Nashik | जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्ववत; व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे


Nashik | सध्या नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न पेटलेला असताना जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकरलेला हाोता त्यातच पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार (दि. 09) डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांमध्ये फूट पडलेली दिसून आली होती. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव आणि विंचूर बाजारसमितीमध्ये लिलाव सुरु होणार आहेत. जे व्यापारी सलग 3 दिवस कांदा लिलाव बंद ठेवतील त्यांचे परवाने रद्द करण्याचा सहकार विभागाने इशारा दिलेला असल्याने त्याच पार्श्वभूमीवर कांदा लिलाव पुन्हा सुरु होणार आहेत. 

नाशिक जिल्ह्यात शेतकरी-व्यापारी दोघांमध्ये उद्रेक

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यात शेतकरी तसेच व्यापारी दोघांमध्ये उद्रेक उसळल्याचा पाहायला मिळाला. शुक्रवारी (दि.09) ठिकठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर कांदा लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी राज्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. अशातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आणि त्यात शेतकऱ्यांनी कसेबसे कांद्याच्या पिकाला जगवलं होतं. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळतो आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर नाशिकमधील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत कांद्याचे लिलाव हे शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे नाशिक जिल्हया मधील विंचुर बाजार समिती वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठा शुकशुकाट बघायला मिळत होता.

पिंपळगाव बाजार समितीत कालपासून लिलाव सुरू

पिंपळगाव बाजार समितीचे सभापती तसेच निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शनिवार रोजी मध्यस्थी करत समन्वय घडवून आणला तसेच व्यापाऱ्यांनी योग्य दराने कांद्याचे भाव द्यावेत, केंद्राच्या निर्यातबंदीच्या ह्या निर्णयाच्या आडून कांदा उत्पादनाचे भाव पाडू नयेत असा तोडगा कांदा प्रश्नी आमदार दिलीप बनकर यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मध्यस्थी करत काढला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर नाशिकच्या पिंपळगाव येथील बाजार समितीत ठप्प असलेले कांद्याचे लिलाव हे शनिवारी (दि. 10)सकाळच्या सुमारास सुरू करण्यात आले होते.