Agro News | औषध फवारणीमुळे द्राक्ष बागा जळाल्या; शेतकरी उध्वस्त


Agro News | सोलापूर | यंदा अत्यल्प पाऊस तसेच अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. चारही बाजूने अडचणीत आलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिलेलं आहे. सदोष औषध फवारणीने सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव परिसरातील तब्बल 50 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावरील द्राक्ष बागा ह्या जळाल्याने शेतकरी उध्वस्त झालेला आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देऊन संबंधित कंपनीवर बंदी घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याकडे केली आहे. 

अवकाळी आणि गारपीट या सगळ्या संकटांचा सामना करत मागील काही वर्षात द्राक्ष उत्पादक शेतकरी सतत संकटात सापडत असल्याचे चित्र आहे. यंदा देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं दिसुन येत आहे. विशेष म्हणजे यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळल्याने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव परिसर आणि मोहोळ तालुक्यातील आढेगाव, पुळूज या भागातील द्राक्ष उत्पादक, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे किटकनाशक औषध फवारणी केल्याने मोठे नुकसान झालेलं आहे.

शेतकऱ्याने आत्महत्या करू नये म्हणून उपाय..

द्राक्ष बागेवर करण्यात आलेल्या कीटकनाशक फवारणीमुळे द्राक्षाच्या बागच्या बागा जळून गेलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करतील या भीतीने ग्रामस्थांनी अशा सर्व कुटुंबासोबत दोन-दोन शेतकरी ठेवण्यात आलेले असून या शेतकऱ्यांच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून चूलदेखील पेटली नाही. तसेच मोठ्या कष्टाने उभारलेली बागा जळाल्याने हे नुकसान कसे भरून काढायचे अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. 

काय घडला नेमका प्रकार ?

सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कीटकनाशक औषधाची फवारणी केली असता एकाच बॅचच्या पॅकिंगचे कीटकनाशक औषधांमधून फवारणी केल्यामुळे द्राक्षाच्या बागा जळून गेल्याचे चित्र समोर आलं. या औषध कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बागांची पाहणी केली असली तरी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याने शेतकरी संतप्त झालेला आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि सदर कंपनीवर माल विक्रीसाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी तसेच राज्य द्राक्ष बागायत संघ, सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांतभैय्या देशमुख यांनी केलेली आहे.