Agro News | कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी 13 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या नोंदण्या


Agro News | खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळणार असून याकरिता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. कृषी सहायकांनी बहिष्कार टाकल्यामुळे नोंदणीची कामे रखडली होती. परंतु या मदतीसाठी राज्यातून आतापर्यंत 13 लाखाहून अधिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांच्या माहितीप्रमाणे, इ-पिक पाहण्याची सर्व आकडेवारी महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे देण्यात आली असून कृषी विभागाने या माहितीमधील शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या गावनिहाय प्रसिद्ध केल्या आहेत.

Agro News | शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार

शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती कृषी सहायकाकडे देण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती सरकारी संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर सोपवली गेली होती. परंतु मधल्या काळात सहाय्यकांनी कामावरती बहिष्कार टाकला. ज्यामुळे राज्यभरात नोंदणीची कामे ठप्प होती. शासनाने मात्र आता कृषी सहायकांना प्रति नोंदणी 20 रुपये सेवाशुल्क देण्याचे ठरवले असून सहायक आणि बहिष्कार मागे घेत नोंदणीची कामे वेगाने सुरू केली आहेत. दिनांक 2 सप्टेंबर रोजी कृषी सहाय्यकांनी रात्रीनंतर जवळजवळ 13 लाखांच्या पुढे शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. ही नोंदणी ई-पीक पाहणीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांपुरताच मर्यादित आहे. या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस सोयाबीन असल्याबाबतची महसूल खात्याने स्वतंत्र यादी तयार केली व ती यादी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सुपूर्त केली तर उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी देखील केली जाईल असे कृषी विभागाकडून राज्य शासनाला कळविण्यात आले आहे.

पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

कृषी सहाय्यक शेतकऱ्यांनी दिलेला आधार क्रमांकाची व त्यांच्या नावाची सरकारी संकेतस्थळावर नोंद करतात, त्यानंतर नोंदणीचा हाफ तपशील नमो शेतकरी सन्मान योजनेतील नावांशी व आधार क्रमांकाची संलग्न करून पडताळला जातो. त्यानंतर नमो योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्याला तो कापूस किंवा सोयाबीन मदतीसाठी पात्र असल्यास हेक्टरी 5000 रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दोन्ही पिके असल्यास कमाल प्रत्येकी दोन-दोन हेक्टरपर्यंत तर एका पिकासाठी कमाल दोन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे दोन्ही पिके असल्यास त्याच्या बँक खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम पुढील दोन आठवड्यात जमा होण्यासाठी राज्य शासनाच्या ‘महाआयटी’ची मदत घेतली जात आहे.

Agro News | ‘सरकारचा कांद्याचा भाव पाडण्याचा डाव’; स्वाभिमानीचे नेते कुबेर जाधवांचा आरोप

यादीमध्ये नाव नसलेल्यांना मदतीबाबत संभ्रम

महसूल विभागाने ई-पीक पाहणी करून 96 लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाला पाठवली आहे. यामध्ये 80.60 लाख व्यक्तिगत शेतकरी तर 15.47 लाख शेतकरी सामूहिकपणे पीक लागवड करणारे आहेत. नमो शेतकरी सन्मान योजनेत 91 लाख शेतकऱ्यांची नावे आहेत. मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेत, तसेच इपिक पाहणी यादीत नाव नसलेल्या पण कापूस व सोयाबीन पिकवत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार हे अजूनही स्पष्ट झाले नाही. (Agro News)