Onion News | कांद्याला हमीभाव न मिळाल्यास…; शेतकऱ्यांचा इशारा


Onion News | कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

Onion News | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत असून, याचे पडसाद काल पासून लासलगाव बाजार समितीत दिसत आहेत. काल लासलगाव बाजार समितीत आक्रमक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले होते. त्यातच आता कांद्याचे भाव वाढवा, अन्यथा राज्यात ठिकठिकाणी बाजार समितीत लिलाव बंद पडण्याचा इशारा ‘महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी’ संघटनेने दिला आहे.

अनेक दिवसांपासून कांद्याचे भाव जमिनीला टेकले आहेत. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे तब्बल १० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या निर्णयापूर्वी ४ हजारांवर असलेला कांदा आता हजारांवर आला असून, यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत कांदा लिलाव बंद पाडले. तसेच यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. दरम्यान, मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या भावात २०० रुपयांची घसरण झाली. (Onion News)

शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विंचूर उपबाजारात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विंचूर नंतर हा संतप्त शेतकऱ्यांचा जमाव आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत धडकला.

Onion News | शेतकरी संतापले; लासलगावमध्ये कांदा लिलाव बंद

मागील आठवड्यात कांद्याला सरासरी १३५० रुपये दर मिळत होता. त्यानंतर, काल सकाळी कांद्याच्या दारात २५० रुपयांनी घसरण होऊन, दर ११०० रुपयांवर आले. कालच्या पहिल्या सत्रात साधारणतः १४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जवळपास एक ते दीड तास लिलाव बंद होते.

Onion News | …अन्यथा रास्ता रोको व रेल रोको आंदोलन करू..

‘सोमवारी अनेक शेतकरी माल घेऊन लासलगाव बाजार समितीत आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव लिलाव पूर्ववत करण्यात आल्याचे बाजार समितीने सांगितले आहे. निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, ही बाब वर सरकारपर्यंत पोहोचावी. यासाठी शेतकऱ्यांनी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जर शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही. तर, पुढील काळात लिलाव बंद पाडण्याबरोबरच रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलन देखील केले जातील.’ असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

Onion News | नाशिकमधल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर टेकले; असे आहेत दर..?

आता लाल कांद्याची आवक वाढली आहे. मात्र, कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांची उन्हाळा कांद्यांची लागवड सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. कांद्याच्या दरांत सातत्याने घसरण होत असल्यामुळे आणि साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. (Onion News)