सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आगामी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रचारासाठी येणाऱ्या या लोकप्रतिनिधींना माळवाडी (ता. देवळा) येथे मंगळवारी (दि. १६) रोजी ग्रामपंचायतीसह सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत बॅनर लावत विरोध दर्शविला आहे. “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार..सत्ताधारी-विरोधक उमेदवारांनी आणि लोकप्रतिनिधींनी मतं मागायला येऊ नये”, अशा आशयाचे फलक लावत प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना विरोध दर्शविला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसत आहेत. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यामुळे माळवाडी येथील आक्रमक शेतकऱ्यांनी “मतं मागायला येऊ नका आणि तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार” अशी भूमिका माळवाडी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका
Onion Export Ban | कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारचे अतोनात प्रयत्न
तसेच यावेळी केंद्र सरकार कांद्याचे दर पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करून दर नियंत्रणात ठेवत असून, त्यात कांद्यावर लादलेली अमर्यादित निर्यात बंदी ही कांदा उत्पादकांच्या माथी मारत आल्याचा मोठा इतिहास हा देश बघतो आहे. परंतु या कृषी विभाग आणि केंद्र सरकारच्या धर- सोडीच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी देशो-धडीला लागत चालल्याची खंत किशोर बागुल, शशी शेवाळे, दिलीप शेवाळे यांनी यावेळी बोलून दाखवली. (Onion Export Ban)
कांदा विषय पुढे करून राजकारण केलं जातं
शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक झळा सोसत आहे. कांदा पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या किंमतीत १० पट वाढ झाली आहे. त्या प्रमाणात कांद्याला दर कधीही मिळत नाही. उलट मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी देशाचे लक्ष कांद्यावर केंद्रित केले जाते आणि इतर वाढत असलेली महागाई दुर्लक्षित केली जाते. जसे की गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष न देता कांदा विषय पुढे करून राजकारण केलं जात आहे. आता माळवाडीसह सर्व शेतकरी जागृत झाले असल्याचेही यावेळी शेतकरी म्हणाले.
याप्रसंगी माळवाडीचे सरपंच मयूर बागुल, खुशाल बागुल, किशोर बागुल, दिलीप शेवाळे, शशी शेवाळे, नाना सोनवणे, प्रतीक बागुल, जीभाऊ शेवाळे, अमोल बागुल, आबा गुंजाळ, राहुल बागुल, विशाल बागुल, गणू बागुल, अनिल जाधव, महेंद्र बागुल, मोहित वाघ, रमेश बागुल, प्रशांत बच्छाव, साहेबराव बागुल, रमेश बागुल, प्रवीण बागुल, विनोद आहेर, महेश बच्छाव, राजेंद्र बच्छाव, तात्या भदाणे, विठ्ठल पाटील, आदींसह शेतकरी उपस्थित होते.(Onion Export Ban)
Onion Export Ban | सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार; कांदा निर्यात बंदी कायम राहणार
शेतकऱ्यांकडे आमचे लक्ष आहे. हे दाखवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी आता ‘कांद्याचे ट्रॅक्टर चालवणे’, ‘कांद्याच्या गरीवर कांदे निवडणे’ असे स्टंट करण्यापेक्षा पक्षादेश बाजूला ठेवून केंद्रात कांदा उत्पादकांना दर मिळवून देण्यासाठी भांडले पाहिजे.
– अविनाश बागुल, शेतकरी
कांदा उत्पादकाने कोणाला मतदान करावे. या विषयी आता आम्ही माळवाडीचे शेतकरी स्वखर्चाने या विषयी जनजागृती करणार आहोत.
– दिलीप शेवाळे, शेतकरी
कांदा प्रश्नावर अपयशी ठरलेले केंद्र सरकार व मुग गिळून गप्प असलेल्या विरोधी पक्षाच्या निषेधार्थ आम्ही प्रत्येक घरावर काळे झेंडे फडकवू. भारती पवार या आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मत मिळवण्यासाठी कांदा गरीवर कांदे निवडण्याचे स्टंट करत आहे. आता हे स्टंट आम्हाला लक्षात आले असून, त्यांनी पक्षादेश जुगारून कांद्याला दर मिळण्यासाठी जोरदार भांडले पाहिजे.
–विनोद आहेर, शेतकरी