Onion News | देवळा येथे खाजगी जागेवर कांदा लिलाव सुरू; असा मिळतोय दर…


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून येथील कळवण रोडवर प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन कांदा खरेदी लिलाव सुरू केला.(Onion News)

Onion News | शुभारंभाला इतका मिळाला दर..

त्याला पहिल्याच दिवशी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो वाहनांनी गर्दी केली होती. सकाळी साडे दहा वाजता स्थानिक शेतकऱ्यांनी बैलगाडीतुन आणलेल्या कांदा बैलगाडीची पुजा करुन खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाला कांद्याला १,४५१ रूपयांची बोली लावली गेली. गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीच्या धरसोड वृत्तीला कंटाळून प्रचलीत लिलाव प्रक्रियेला फाटा देत. शेतकऱ्यांचा एक रुपयाही कपात न करता कांदा लिलाव सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत लिलावासाठी वाहनांची गर्दी झाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मशगुल असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्यास वेळ नाही. जिल्हाधिकारी, व्यापारी व हमाल मापारी यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मशगुल असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. या ज्वलंत प्रश्नाची तड लावण्याचे धाडस शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवले. (Onion News)

Onion Rate | सात दिवसांनंतर बाजार समित्या सुरू; असे आहेत आजचे कांद्याचे भाव…

कपात न करता रोख रक्कम अदा

त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणीक निकम यांनी शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी बांधवांशी चर्चा केली व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहुन पाठींबा जाहीर केला. यामुळे लिलावात व्यापाऱ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जास्तीत जास्त १४५१, सरासरी १२५० ते १३००, कमीत कमी ९०० रुपये याप्रमाणे कांदा खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कपात न करता रोख पेमेंट रक्कम अदा केले आहे.

या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व व्यापारी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने विठेवाडी येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र आहेर, कैलास कोकरे, विलास मेधने, संजय सावळे, राजेंद्र जाधव, समाधान निकम आदींसह देवळा तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतकुर, दिपक गोसावी, मुन्ना शिंदे, दिनकर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.(Onion News)

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका


गेल्या १२ दिवसांपासून बाजार समिती मधील कांदा व्यापार ठप्प असल्याने या काळात जवळपास १२०० ते १३०० कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी, स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच खाजगी जागेत हे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

– कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता व्यापारी व जागा मालक यांच्याशी सम्नव्य साधून खाजगी जागेवर कांदा खरेदी सुरु करण्यात आले असून , शेतकर्यांकडून कुठलीही कापत केली जाणार नसून , रोख पेमेंट मिळणार आहे . शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून ह्या खाजगी मार्केट मध्ये विक्रीस आणावा.

– कृष्णा जाधव (प्रहार शेतकरी संघटना, जिल्हा उपाध्यक्ष)