Onion Auction | अखेर कुठलीही कपात न करता २१ दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गेल्या २१ दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्यांचे लिलाव सोमवारी (दि. २२) पासून सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरांमध्ये कुठलीही कपात न करता कांदा लिलाव सुरू करण्यात आले. हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात बंद करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने (दि.२०) एप्रिल रोजी सर्व बाजार समित्यांना निवेदन देऊन जोपर्यंत निर्णय लागत नाही. तोपर्यंत कांदा लिलावात भाग घेतला जाणार नसल्याच्या मुद्द्यावर १ एप्रिल पासून कांदा लिलाव बंद होते. (Onion Auction)

Onion Auction | बाजार समित्यांचे कोट्यवधींचे नुकसान

यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून देवळा येथे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी याठिकाणी कुठल्याही प्रकारची कपात न करता खाजगी मार्केट सुरू केले होते. याला शेतकऱ्यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, यात बाजार समित्यांचे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान टाळण्यासाठी व लिलाव सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी दिलेल्या ठरावानुसार जिल्हा व्यापारी असोसिएशनची रविवारी (दि. २१) रोजी बैठक घेण्यात आली.

Onion Export Ban | कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या नेत्यांनो आता मतं मागायला येऊ नका

कांद्याचा दर

येथे हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात न करता सोमवारी (दि. २२) पासुन कांदा लिलाव सुरू करण्याचे ठरविण्यात आले. यामुळे कांदा लिलाव सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. देवळा बाजार समितीच्या आवारात काल ३१२ ट्रॅक्टर, ६८ पीकअप, ३ बैलगाडी अशा वाहनातून जवळपास सात हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. ह्या कांद्याला जास्तीत जास्त १८००, सर्वसाधारण १४०० तर कमीत कमी ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.(Onion Auction)

Nashik Onion | खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे धाबे दणाणले

गेल्या २१ दिवसांपासून कांदा लिलाव बंद असल्याने देवळा बाजार समितीची १० कोटींची उलाढाल ठप्प होऊन बाजार समितीचे जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
माणिक निकम (सचिव, देवळा बाजार समिती)

सोमवारी (दि. २२) पासून देवळा बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव सुरळीत चालू आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची कपात होणार नसून, शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून देवळा बाजार समितीत विक्रीसाठी आणावा.
योगेश आहेर – (सभापती, देवळा बाजार समिती)