Nashik Onion | खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे धाबे दणाणले


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गेल्या १५ दिवसांपासून नाशिकमधील बाजार समित्या बंद असून, यामुळे कांदा लिलाव ठप्प असल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे नाशिक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. १५) रोजी सटाणा येथील सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने देवळा कळवण रोडवरील नविन खाजगी कांदा खरेदी केंद्राची पहाणी केली आणि या जागेचा पंचनामा केला.

मात्र, यावेळी सकाळच्या सत्रातील लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याने पथकाला जागेवर व्यापारी, शेतकरी, यांच्याशी संपर्क साधता आला नाही. दुपारी १२ नंतर सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांनी देवळा बाजार समितीच्या सभागृहात व्यापारी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व बाजार समिती प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन व्यापारी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली. (Nashik Onion)

Onion Auction | कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा अन् दगडफेक; शेतकरी जखमी

यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतकर व दिपक गोसावी यांनी सांगितले की, “शेतकरी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला लिलाव सुरू करण्यासाठी आग्रह धरल्याने आम्ही खाजगी जागेवर कांदा खरेदी केंद्र सुरू केले. जास्त काळ बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने आमचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आम्ही खाजगी जागेवर कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे.

तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी सांगितले की, “गेल्या १५ दिवसांपासून बाजार समितीचे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतात पडुन आहे. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना गळ घातली व शेतकऱ्यांसाठी आम्ही खाजगी जागेवर कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. (Nashik Onion)

Onion News | देवळा येथे खाजगी जागेवर कांदा लिलाव सुरू; असा मिळतोय दर…

गेल्या १५ दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्यांचा संप हा पुर्णपणे बेकायदेशीर असून तो तात्काळ मागे घेवून लिलाव सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी कुबेर जाधव, कृष्णा जाधव, माणिक निकम, महेंद्र आहेर, कैलास कोकरे, महेंद्र परदेशी, आदी शेतकरी प्रतिनिधींनी सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांच्याकडे केली. यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, सटाणा बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, देवळा बाजार समिती सचिव माणिक निकम आदी उपस्थित होते.