Nashik | जिल्ह्यात कांदा लिलाव सुरु; बाजारसमितींची परिस्थिती काय?


Nashik | नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीवरून शेतकरी तसेच व्यापारी वर्ग चांगलाचा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील गुरुवार (दि. ०७) पासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे कांदा लिलाव देखील ठप्प होते. मात्र कालपासून (दि. ११) पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या सुरु करण्याचा निर्णय स्थानिक बाजार समिती प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा लिलाव सुरु झाले असून आजचा कांद्याचा बाजारभाव काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वातावरण हे कांदा प्रश्नाने तापल्याचे पाहायला मिळालं. कांदा निर्यात बंदीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील अनेक भागात आंदोलनदेखील करण्यात आले. कालही चांदवड येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वात कांदा प्रश्नी आंदोलन पार पडले. त्यातच काल शेतकरी तसेच व्यापारी वर्गाचं नुकसान टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कालपासून नाशिक जिल्ह्यातील विंचूर, मनमाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत तसेच इतर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी वर्गाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

लासलगाव बाजारसमिताकडून करण्यात आले आवाहन

या दरम्यान, लासलगाव बाजार समितीकडून शेतकरी बांधव, अडते, व्यापारी आणि इतर बाजारसमिती घटकांना आवाहन करण्यात आलेले आहे. काल दुपारी 01 वाजता लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा या शेतीमालाचे लिलाव नियमितपणे सुरू झालेले आहेत. शेतकरी बांधवानी आपला कांदा हा शेतीमाल प्रतवारी करुन विक्रीस आणावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भरत दिघोळे म्हणाले की, आजपासून बाजार समित्या सुरु झालेल्या आहेत. शेतकरी बाजारसमितीत येतील आणि कांद्याला काय बाजारभाव मिळतो, याकडे आमचेही लक्ष आहे. आज काय दर येतो, हे बघावे लागणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे.