Garlic Price | कांद्यापाठोपाठ लसूण महागला; तब्बल 400 रुपये किलो भाव


Garlic Price | मसालेदार जेवण कोणाला आवडत नाही! याच मसाल्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण. कांदा किंवा लसूण एखाद्यापदार्थात नसेल तर अनेक खवय्यांच्या जीभेला चवही लागत नाही हे वास्तव आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात तसेच हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण असणार नाही असं अपवादात्मक परिस्थितीत बघायला मिळेल. त्यामुळे कांदा आणि लसणाला नेहमीच मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला भाववाढीतून सातत्याने रडवलं हे मात्र वास्तव आहे.

लसणाचे दरवाढीमागे कारण काय?

राज्यात सध्या कांद्यापाठोपाठ आता लसूणदेखील महागला असून प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडल्याने पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यापासून 200 ते 250 रुपये किलो दर असलेला लसूण आता 350 ते 400 रुपये दरापर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत लसणाचे दर वाढल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

कुठे कुठे लसणाचा भाव वधारला?

राज्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणजे दादर मार्केट पाठोपाठ नवी मुंबईच्याही बाजारात लसण्याच्या दरात वाढ झाली आहे. लसणाची आवक घटल्यामुळे भावात वाढ झाल्याचं तिथेही बोललं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होते आहे. मुळातच लसणाचं उत्पादन कमी असल्याने लसणाचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण 350 रुपये किलोपर्यंत गेला असून किरकोळ बाजारात लसणाचा भाव प्रतिकिलो 400 ते 410 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

गेल्या महिन्यात लसणाचा दर किती होता?

सध्या लसणाने चांगलीच उसळी घेतलेली आहे. गेल्या महिन्यात लसणाचा दर किलोमागे 120 ते 140 रुपये इतका होता मात्र आता हाच दर 400 रुपयांवर पोहोचला आहे. मागे दिवाळीच्या निमित्ताने गुजरात आणि मध्यप्रदेशमधून लातुरच्या बाजारात लसूण विक्रीला आलेला होता आणि आठवड्याला किमान 100 क्विंटल लसूण बाजारात आणला गेला होता.