Onion News | गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वातावरण हे कांदा प्रश्नाने चांगलच तापल्याचे पाहायला मिळालं. कांदा निर्यात बंदीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील अनेक भागात आंदोलनही करण्यात आले. कालही चांदवड येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वात कांदा प्रश्नी आंदोलन पार पडले. त्यातच काल शेतकरी तसेच व्यापारी वर्गाचं नुकसान टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कालपासून नाशिक जिल्ह्यातील विंचूर, मनमाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत तसेच इतर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी वर्गाला काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, विचित्र हवामान, अवकाळी पाऊस तसेच गारपीट यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढलेले असून रोप आणि लागवड झालेला कांदा अज्ञात रोगाने अचानक पिवळा पडून कांदा रोपाला गोलाकार आळेपिळे पडत आहेत. हा कांद्याची पिकं धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत आलेला आहे. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, पाडळी, आदिनाथनगर तसेच इतर गावांत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला. तरीही या परिसरातील शेतकऱ्यांनी मशागती करून कांदा लागवड केली.
सकाळच्या धुक्याने कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, कांदा रोपे, खते, लागवड, यावर मोठा खर्च केला मात्र वातावरण बदलाने कांदा पिवळा पडून रोपाला गोलाकार आळे पिळे पडलेले दिसत असून सकाळच्या सुमारास निर्माण होणारे धुकं यामुळे कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशा वातावरणाचा फटका कांदा पिकास बसल्याने कांदा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले जाऊ शकते.