Rain Update | मागील वर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सोमोरे जावे लागले. यातच अपेक्षित पाऊस न झाल्याने डिसेंबर महिन्यातच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यासह अनेक भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून ऐन थंडीत शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ बसताना दिसत आहे.
मात्र, आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये फेब्रुवारी ते मे या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त पावसाचे संकेत असून यामागील कारण म्हणजे अल निनोची परिस्थिती मध्यम बनण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे.
Rain Update | नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता
आगामी मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत म्हणजे जून आणि जुलैमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून तथापि, भारतीय हवामान विभाग एप्रिलच्या मध्यापर्यंत हंगामाचा पहिला अंदाज जाहीर करणार आहे. जागतिक हवामान मॉडेलनुसार, काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हा देशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
कोरियन हवामान संस्थेच्या अंदाजानुसार, एप्रिल हा कमी पावसाचा महिना असू शकतो. तर केरळ, पश्चिम मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्याचवेळी, जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. गुजरात, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि मेघालयमध्ये तापमान किंचित कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain Update | जूनमध्ये मुंबईसह काही भागात पावसाची चिन्हे
यंदा जूनच्या महिन्यात देशाच्या बहुतांश भागात अधिक पाऊस अपेक्षित असून अशीच परिस्थिती जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या ओडिशातील काही भाग वगळता, जेथे पाऊस थोडा कमी असण्याची शक्यता आहे. कोरियन मॉडेलनुसार मुंबई, तेलंगणा आणि विदर्भाच्या काही भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.