PM Modi | मोदींचा ‘नाशिक’ दौरा मात्र कांद्यावर शब्दही नाही!


अंकिता जाधव – विशेष प्रतिनिधी : PM Modi | कांद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदी आले होते. राष्ट्रीय यूवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पं. मोदी हे आज नाशिक नगरीत हजर होते. दरम्यान, नाशकात सध्या कांदा प्रश्न पेटलेला असताना शेतकरी संतप्त झाले आहेत. आज पं. मोदी कांदा उत्पादकांशी संवाद साधतील अशा मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली होती मात्र, मोदींच्या कार्यक्रमात शेतकरी किंवा सर्वसामान्यांशी संवाद झाला नाही. कांदा निर्यातीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर सरकार काही भूमिका मांडेल, अशी आशा शेतकरी आणि शेतकरी संघटनांना वाटत होती. मात्र, आजचा कार्यक्रम पाहता हा मुद्दा शिताफीने वगळला असल्याचं दिसून आलं.

आज नाशिक नगरी रामनामाने दुमदुमून गेली असता आजतरी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा निघणार असं वाटत असताना पंतप्रधान मात्र कांद्यावर काहीही बोलले नाहीत. बाजरींना त्यांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे भारतात “श्री अण्णा” म्हणून संबोधले जाते. “श्री अण्णा” या शब्दाचा इंग्रजीत अनुवाद “सन्मानित धान्य” किंवा “सर्व धान्यांची माता” असा होतो. दरम्यान, श्री अण्णा हा शेतकऱ्यांशी निगडित विषय आहे, त्यामुळे तरुणांना श्री अण्णांसोबत येण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदींनी एकप्रकारे शेतकऱ्यांचे महत्त्व पटवून दिले आहे.

नाशिक हा कांद्याचा बालेकिल्ला असल्याने कांद्यावर काही चर्चा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. धान्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी तरुणांना भरड धान्याशी जोडण्यावर आणि त्यांना जागरूक करण्यावर पूर्ण भर दिला.

 Onion
Onion News

PM Modi | नाशिकमध्ये काही शेतकऱ्यांना नोटीसा

पं. मोदींच्या नाशिक दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव, काही शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या, जेणेकरून त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा गोंधळ होऊ नये. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी निर्यातबंदीला विरोध करत असल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. निर्यातबंदीमुळे आपल्या कमाईत घट झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, सरकारचे म्हणणे आहे की देशांतर्गत बाजारातील किंमती नियंत्रणात राहतात, त्यामुळे निर्यातीवर बंदी आहे. या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, म्हणून नाशिकमध्ये काही शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आलेली होती.

PM Modi | शेतकरी नेत्यांवर करडी नजर ठेवली..

कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून नाशिक हे महाराष्ट्रातील कांदा उत्पादनाचा गड आहे. अशा स्थितीत येथे पंतप्रधानांच्या आगमनाला शेतकरी संघटनांकडून निषेध किंवा काळे झेंडे दाखवण्याची भीती वर्तवण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेतकरी नेत्यांवर करडी नजर ठेवली होती. पंतप्रधानांनी नाशिक दौऱ्यापूर्वी निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन करू, असे काही शेतकरी संघटनांनी सांगितलेले होते.