Onion News | कांदा लिलावाच्या शुभारंभाच्या दिवशी ‘या’ मार्केटमध्ये कांद्याची प्रचंड आवक


Onion News | सोमनाथ जगताप – देवळा | देवळा येथील सुनील आहेर खाजगी कृषी मार्केट सहकार क्षेत्रातील बाजार समित्यांना लाजवेल अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी सर्व सोयीनीयुक्त तयार करण्यात आले असून, यामाध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला देखील काम मिळाले आहे. कांदा लिलावाच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी या खाजगी मार्केटमध्ये कांद्याची प्रचंड आवक पाहता हि भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी आज येथे केले.

देवळा येथे आज बुधवार रोजी सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटमध्ये कांदा लिलावाचा भव्य शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांदा व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खडूं देवरे हे होते. प्रास्ताविक मार्केटचे अध्यक्ष सुनील आहेर यांनी केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, प्रसिध्द कांदा व्यापारी खडूं देवरे, वणीचे मनीष बोरा, प्रगतिशील शेतकरी कुबेर जाधव, शरद खैरणार, जि. परिषदच्या माजी सदस्या डॉ. नूतन आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Onion News
Onion News

Onion News | कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित

या कांदा लिलावाच्या शुभारंभा निमित्ताने आंतर राष्ट्रीय तसेच पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, तेलंगणा, राज्यस्थान येथील तसेच देवळा, सटाणा, पिंपळगाव बसवंत, उमराणे येथील व्यापारी बांधव उपस्थित होते. या सर्वांचा संचालक सुनील आहेर, प्रफुल्ल आहेर, ललित निकम, धनंजय देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नवीन खाजगी मार्केट मध्ये शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी ५५७ ट्रॅकर, १७५ रिक्षा, २० बैलगाडी अशा ७५२ वाहनातून लाल कांदा विक्रीसाठी आला होता. त्याला सर्वाधिक २ हजार १२१ तर सरासरी २ हजार आणि कमीत कमी ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. या खाजगी मार्केटमुळे तालूक्यातील शेतकऱ्यांची वेळ तसेच पैशाची बचत होणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

Onion News | मार्केट मुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान केले व्यक्त

देवळा येथे मालेगाव रोडवर सुरु झालेल्या सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तेनुसार उच्च बाजार भाव मिळणार असून, लिलावासाठी प्रशस्त आवार उपलब्ध करून देण्यात आले आहे. माल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुभवी व्यापारी वर्ग असणार आहे. तसेच शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळणार असून, या मार्केट चे संपूर्ण कामकाज संगणकीयकृत आहे. सर्वसोयींनीयुक्त मार्केट मुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.