Rain Subsidy | शेतकऱ्यांची अनुदानाची प्रतीक्षा काही संपेना…!


Rain Subsidy | यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने यावर्षी नाशिक जिल्ह्यात डिसेंबर महिन्यातच दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत आणि वाड्यांमध्ये डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्यासाठी ट्रॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून यावरून यावर्षी येत्या उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहे.

दरम्यान, यातच नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी तसेच गारपीटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे द्राक्ष, ऊस, गहू, डाळिंब आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यासर्व परिस्थितीमुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं मात्र तरीही 104 महसूल मंडळातील शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

दरम्यान, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली असून या योजनेतून मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर दिवाळीपूर्वी 50 टक्के अनूदान करण्यात आलं आहे.

Rain Subsidy | काय आहे पंतप्रधान पीक विमा योजना?

नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू करण्यात आली असून या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार तसेच शेतकऱ्यांच्या हिश्श्यातून या योजनेचा लाभ देण्यात येतो.

यंदा मालेगाव तालुक्यात पावसाळ्यात अडीच महिन्याचा ‘ड्राय स्पेल’ गेला आणि त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके करपत या पिकांचं नुकसान झालं. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील 1 लाख 16 हजार खातेदारांनी नोंदणी केली होती तर त्यात मालेगाव, निमगाव, दाभाडी, वडनेर, सौंदाणे, झोडगे, कळवाडी, अजंग, जळगाव निंबायती, डोंगराळे, करंजव्हाण, कौळाणे निं., सायणे बुद्रुक अशा 13 महसूल मंडळांमधील 97 हजार 665 शेतकऱ्यांनी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा अशा सात पिकांचा विमा काढण्यात आला आहे.