Onion News | नाशिक जिल्हा हा कांद्याचा बालेकिल्ला मानला जातो कारण नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यातच आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणजेच लासलगाव बाजारसमिती ही देखील नाशिक जिल्ह्यात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच नुकसानीत असताना आता हवामानातील बदल, घसरतं तापमान आणि बुरशीजन्य आजाराचा फटका राज्यतील अनेक भागातील कांदा उत्पादकांना बसत आहे.
यातच, अंबड तालुक्यातील हस्तपोखरी परिसरातील कांद्याची वाढ खुंटली असून त्यामुळे कांदा पिकाच्या उत्पादनात घट होण्य़ाची भिती कांदा उत्पादकांना आहे. हवामानातील बदल आणि वाढती थंडी यामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असून कांद्यावर केलेला खर्चही हाती येतो की नाही हीच काळजी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना वैताग देत आहे.
Onion News | अंबड तालुक्यात कमी क्षेत्रात कांदा लागवड
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र, यंदा राज्यात अत्यल्प झालेल्या पावसाने अंबड तालुक्यात कमी क्षेत्रात कांदा लागवड करण्यात आली आहे. अंबड तालुक्यात एकूण २०० हेक्टरवर कांदा लागवड करण्यात येते मात्र, यंदा कांद्याची लागवड कमी झालेली आहे. आणि आता त्यातच कांद्यावरील या रोगाने शेतकऱ्यांना अक्षरशः हैराण केल्याचं दिसून येत आहे.
Onion News | कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव
राज्यातील अत्यल्प पाऊस, अवकाळी आणि गारपीट, सध्या वाढणारी थंडी यामुळे कांदा पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला असून ज्या भागात कांदा पिक उगवलं आहे, तिथे कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च करावा लागत असून अंबड तालुक्यात कमी पावसामुळे कांद्याची लागवड कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरच भर दिल्याचं दिसून येत आहे.