Agriculture News | कसमादेतील ‘या’ पिकाला इतर राज्यांतून वाढली मागणी


Agriculture News | नाशिक जिल्हा हा कांद्याचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं जातं. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचं पिक घेण्यात येते आणि संपुर्ण देशासह इतर देशातही नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी असते. मात्र सध्या देशभरातून कसमादे पट्ट्यातील एका पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ते पिक कांदा नसून ते आहे गुणकारी शेवगा.

कसमादे पट्ट्यात अनेक पिंकाचं उत्पादन घेतले जाते आणि त्या पिंकाना राज्यात मोठ्या प्रमाणात मागणीही असते. सध्या तामिळनाडू आणि गूजरात राज्यातून शेवाग्याची मागणी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतात शेवग्याच्या उत्पादनात तामिळनाडू हे राज्य अव्वल असून तमिळनाडूत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेवग्याच्या उत्पादनावर मोठं नुकसान झाले आहे.

Agriculture News | शेवगा कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार

तामिळनाडू राज्यातील अवकाळी पाऊस हा कसमादे शेतकऱ्यांना चांगला ठरत असून कसमादे पट्ट्यातील शेवग्याला ७० ते ८० रुपये किलोचा दर मिळत आहे. तसेच पुढे भविष्यातदेखील शेवग्याचे हे दर टिकून राहण्याची शक्यता असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेवगा कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. कसमादे पट्ट्यातील शेवगा प्रामुख्याने मुंबई, चेन्नई येथील बाजारात विकला जातो. कसमादेसह संपुर्ण नाशिक जिल्ह्यात दहा ते बारा हजार एकरवर शेवग्याची लागवड करण्यात आली आहे.

शेवग्याची लागवड ही प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जात असून भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. दरम्यान, शेवग्याचं कसमादेत दर्जेदार उत्पन्न घेतले जात आहे. चांगल्या दर्जाचा शेवगा ७० ते ८० रुपये किलोने विकला जात असून कमी पावसात येणारे पीक म्हणून शेवगा ओळखला जातो.

Agriculture News | जानेवारी महिन्यात उच्च प्रतिचा शेवगा बाजारात येतो

शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम, भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. शेवग्याचे पीक डिसेंबर ते जून या कालावधीत घेतले जाते. सर्वसाधारणपणे, जानेवारी महिन्यात उच्च प्रतिचा शेवगा बाजारात येतो. सध्या कसमादेत शेवगा काढणीची धूम असून परराज्यातील घाऊक व्यापारी कसमादेत आलेले आहेत.

दरम्यान, कसमादे पट्ट्यात डाळिंब आणि शेवगा सोडता इतर पिकांना दर मिळत नसल्याने कसमादे पट्ट्यातील शेतकरी अडचणीत असताना निसर्गाने साथ दिल्यास डाळिंब आणि शेवगा दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे.