Agriculture News | अखेर महागाईला लागणार ब्रेक; केंद्र सरकारने आखली मोठी योजना


Agriculture News | यंदा राज्यासह देशात अत्यल्प पाऊस आणि नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान झालेला अवकाळी तसेच गारपीटीने शेती उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. यामुळे सध्या राज्यासह देशात अनेक शेती उत्पादनांच्या किमती गगनात पोहोचल्या असून यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना आखली आहे.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या मदतीने ते 3,00,000 टन गहू बाजारात आणणार असून विशेष म्हणजे FCI हा गहू तीन सरकारी एजन्सींना वाटप करणार आहेत. या तीन एजन्सी 3,00,000 टन गव्हाचे पिठात रूपांतर करणार असून 10 किलोच्या पॅकेटमध्ये भारत ब्रँड आटा या नावाने परवडणाऱ्या दरात विकणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

Agriculture News | महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न

महागाई कमी करण्यासाठी देशात सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असून केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतरही खाद्यपदार्थांच्या किमती वाढताना दिसत आहेत. मात्र, सरकार किरकोळ महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने निर्णय घेत असून अन्नधान्य महागाईवर मात करण्यासाठी मार्चपर्यंत भारत ब्रँड नावाने पीठ विकणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या तीन एजन्सींच्या मदतीने सुमारे 1,00,000 टन गव्हाचे पिठात रूपांतर करून त्याची विक्री केली. दरम्यान, जानेवारीमध्ये या तीन एजन्सींद्वारे ग्राहकांना पिठाच्या स्वरूपात सुमारे 3,00,000 टन गहू ऑफलोड करण्याची सरकारला अपेक्षा असून गेल्या डिसेंबर ते जानेवारीपर्यंत सुमारे 4,00,000 टन गहू भारतीय पिठाच्या रूपात ग्राहकांना पाठवला जाईल अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे..