Weather Update | पुढील दोन दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता!


Weather Update | सध्या हवामानात अनेक बदल होत असून डिसेंबर अखेरीस तसेच नववर्षाच्या सुरूवातीला महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्य वगळता देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी असून अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा कमी झाले असून सध्यातरी थंडीपासून दिलासा मिळण्याची आशा नसल्याचेही वृत्त आता समोर येत आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयापासून आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सुरू होण्याची शक्यता असून या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागात थंडी पुन्हा एकदा वाढू शकते. या थंडीच्या लाटेत धुक्यानेही लोकांना चांगलेच हैराण केले असून पुढील तीन दिवस उत्तर भारतातील राज्यांमध्ये सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update | वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता

वाढत्या थंडीच्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये तापमान ३ ते ७ अंशांच्या दरम्यान घसरले असून पुढील दोन दिवसात आणखी एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहेत. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हिमाचल प्रदेशात 16 आणि 17 जानेवारी रोजी हलका पाऊस तसेच बर्फवृष्टी होऊ शकते आणि 17 जानेवारीला उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होऊ शकते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांत 16 ते 18 जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये १७ जानेवारीला गारपीट होणार असून पुढील 24 तासात अंदमान आणि निकोबार बेटांचा दक्षिण भाग वगळता संपूर्ण देशात कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.