Weather Update | थंडीची वाढती लाट; ‘या’ राज्यांसाठी अलर्ट जारी


Weather Update | महाराष्ट्रात नुकताच अवकाळी पाऊस बरसून गेला असताना राज्यभर पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस एवढे असून पुढील दोन दिवसात तापमान हे २ ते ३ अंशाने वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून त्यानंतर तापमानात काहीशी घट होणार असल्याचेही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असून यासोबतच दाट धुक्याचा परिणामही दिसून येत आहे. दिल्ली एनसीआरपासून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. यंदाच्या थंडीने या हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढले असून देशातील अनेक भागांच्या किमान तापमानात सातत्याने घट होत आहे.

Weather Update
Weather Update

Weather Update | अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर धुके

आयएमडीने जाहीर केलेल्या शनिवारच्या आकडेवारीनुसार, अनेक ठिकाणी किमान तापमान तीन ते सात अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले असून याशिवाय पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर धुके दिसून आले. तसेच पश्चिम बंगालमध्ये दाट धुके दिसून आले. दिल्लीत आज सकाळीही दाट धुके पाहायला मिळाले.

हवामान खात्याने आधीच देशाच्या काही भागात दाट धुक्याचा इशारा दिला असून 14 आणि 15 जानेवारीला दिल्लीतही दाट धुके पडेल असे सांगितले आहे. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या. धुके आणि थंडीच्या लाटेमुळे दिल्लीत 22 ट्रेन उशिराने धावत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याने आपल्या अंदाजात 14 जानेवारीला दिल्लीत थंडीची लाट येईल असे म्हटले आहे.

Weather Update | धुक्याबाबत अलर्ट जारी

महाराष्ट्रासह दिल्लीतही धुके आणि थंडीची लाट असताना हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली असून चेन्नईमध्येही सकाळी दाट धुके होते, त्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने 14 आणि 15 जानेवारीला धुक्याबाबत यलो अलर्ट जारी केला असून ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त, उत्तर भारतातील राज्यांमध्ये या दोन दिवसांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.