Weather Update | यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने थंडी देखील कमी प्रमाणात भासेल असा अंदाज हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आला होता. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाही अपेक्षित थंडी जाणवली नाही असं असताना काल पुणे शहरात १४ अंश सेल्सियस तर गोंदियामध्ये १३.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे.
यावर्षी महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आधीच पुरता खचला असताना यंदा थंडीही हुलकावणी देऊ पाहत होती मात्र कालपासून राज्यात गार वाऱ्यासह थंडीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा घसरू लागला असून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात घसरण झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक भागात थंडीची चाहुल लागलेली असताना किमान काही जिल्ह्यात तापमान हे १५ अंशांच्या खाली उतरलेले आहे. यातच काल गोंदिया जिल्ह्यात १३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर आता या संपुर्ण आठवड्यात थंडी कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
Weather Update | अचानक थंडी वाढण्याचं कारण काय?
राज्यात अचानक हवेतील गारवा वाढण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात मात्र आताच्या हवेतील गारवा वाढण्यामगील कारण म्हणजे आग्नेय अरबी समुद्राला जोडून भारतीय उपसागरात चक्राकार वारे वाहत असून या वाऱ्यांमध्ये आर्दता असल्याने राज्याच्या काही भागात धुके पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर आता पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
थंडीचा पिकांना नक्की काय असतो धोका?
दरम्यान, राज्यात आठ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान खाली आलं की पिकांवर परिणाम व्हायला सुरुवात होत असते तसेच आठ अंशांपेक्षा कमी तापमान झालं पिकांवर निश्चितपणे वाईट परिणाम होतो म्हणजेच पिकांची पानं करपायला लागतात. यातच आठ अंशांपेक्षा कमी तापमान झाल्यावर पिकांच्या पोषक द्रव्य शोषणाच्या क्रियांवर मोठा परिणाम होत असतो.
हवामानात गार वारे वाहू लागले की, रबी पिक जसं की गहू, हरभरा या पिकांना जास्त धोका संभवतो तसेच द्राक्ष यांसारख्या पिकाला धोका वाढू शकतो. अशी पिकं जी काढणीला आलेले नाही पण लागवड झाली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही पिकं काढणीला येऊ शकतात त्यांच्यावर मात्र या हवामानातील बदलाता मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.