Agro Tips | अवकाळीच्या तडाख्यातून कशी वाचवता येऊ शकतात पिकं?


Agro Tips | सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी अगदी हवालदिल झालेले असताना शेतकऱ्यांची पिके धुळीला मिळताना दिसत आहे. राज्याच्या काही भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. यात आता शेतकरी मोठ्या संभ्रमात पडलेले आहेत. अवकाळीच्या तडाख्यातून कशी वाचवता येऊ शकतात पिकं? असा सवाल सगळ्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

अवकाळी पाऊस झाल्यावर नवीन बहार धरलेल्या फळपिकांमध्ये रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्याकरीता आवश्यक ती फवारणी तज्ञांच्या सल्लयाने करावी तसेच भाजीपाला पिकामध्ये करपा रोगाचा आणि किडीमध्ये रस शोषण करणारी थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव होवू शकतो. या पिकांमध्ये दिसून येणारे बदल पाहून त्या अनुषंगाने खताचा वापर तज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.

अवकाळीत कशी घ्यावी काळजी?
अवकाळी पावसाची चाहूल लागली की लगेच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा तसेच झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे. शेळ्या, गाय, म्हैस आणि इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधणे योग्य असते. अवकाळीच्या काळात जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्यामध्येच चारा आणि पाण्याची उपलब्धता करून घ्यावी.

तत्काळ करा काढणी
अवकाळीची चाहुल लागताच पिकाची काढणी आणि मळनीची कामे तत्काळ उरकून घ्यावी. कापणी आणि मळणीच्या कामास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टरद्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य देणे योग्य ठरते. कापणी झाली असल्यास आणि पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवण्यास प्राधान्य द्यावे. कापणी तसेच मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.

टिप – वरील दिलेली माहीती हा फक्त अंदाज आणि त्यावरील साधारण उपाय आहेत. शेतीविषयक औषध किंवा संवेदनशील बाबी बाबत तज्ञांचा सल्ला घ्यावा.