Nashik Grapes | ‘फक्त १५ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं’; निफाडमध्ये शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर फिरवली कुऱ्हाड


Nashik Grapes | नाशिक जिल्ह्याला भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखले जातं. देशातून होणाऱ्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी निम्म्याहून अधिक वाटा नाशिक जिल्ह्याचा असून नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाची पाणलोट क्षेत्रे म्हणजे कळवण, पींट इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, सटाणा, सुरगाणा, दिंडोरी, मालेगाव आहेत.

द्राक्ष उत्पादनासाठी दरवर्षी द्राक्ष उत्पादक लाखो रुपयांचा खर्च करतात अन् त्यात यंदा आलेल्या अवकाळी आणि गारपीटीने वैतागलेल्या निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील द्राक्ष उत्पादक बाळासाहेब सानप यांनी तबेबल ६ एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविली. दरम्यान, द्राक्ष उत्पादनात यंदा ४० ते ५० लाखांचे नुकसान होऊन आता हातात काहीच नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसला त्यातच यामुळे द्राक्षांचं नुकसान झालं. २६ नोव्हेंबर रोजी निफाड तालुक्यात द्राक्षबागांचे गारपिटीच्या तडाख्यात अतोनात नुकसान झाले आणि गारांचा मार लागून अक्षरशः बागांमध्ये वेलीवर पाने सुद्धा उरली नाहीत. तयार झालेली काडी मोडली तसेच द्राक्षाचे घड तुटून पडले अन् त्यामुळे निफाडमधील अनेक शेतकऱ्यांचा यंदाचा द्राक्ष हंगाम वाया गेला.

Nashik Grapes | सानप यांनी का उचललं एवढं टोकाचं पाऊल?

निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील द्राक्ष उत्पादक बाळासाहेब सानप यांनी २०१४ साली थॉमसन आणि सुधाकर सिडलेस वाणाची प्रत्येकी ३ अशी ६ एकर लागवड केली यातच द्राक्षबाग उभारणीसाठी त्यांनी २५ लाखांचे कर्ज काढले होते मात्र लाखो रुपयांची गुंतवणूक करूनदेखील निसर्गाच्या लहरीपणा अन् बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे तोटा वाढत चालला होता.

सानप यांनी आजवर घेतलेले कर्ज तर फेडले मात्र आता हातात काहीच उरलं नसल्याने अगदी कठोर अंतःकरणाने सानप यांनी आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविली आहे. गारपीट आणि अवकाळीमुळे बागेत पाने तसेच कोवळ्या द्राक्ष घडांचा सडा पडला. त्यामुळे द्राक्षवेली ह्या रोगग्रस्त झाल्या आहेत.

निफाड तालुक्यात झालेल्या गारपीटीचा मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला असल्याने अनेक बागायतदार अखेर वैतागून द्राक्षबाग तोडण्यावर भर देत आहेत. अशी भयानक गारपीट कधीही पाहिली नव्हती तसेच फक्त १५ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, कोरोना काळानंतर द्राक्ष उत्पादक थोडेफार सावरले असतानाच गारपिटीने मोठा घात केला आणि त्यामुळेच लासलगावच्या पूर्व भागातील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा तोडण्याचा निर्णय घेत आहेत.