Water Shortage | देवळा तालुक्यात २५ गावे, ३२ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा


Water Shortage | यंदा पाऊस कमी झाल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाई असून, पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस अत्यल्प प्रमाणात झाल्याने फेब्रुवारीपासूनच पाणीसाठा खालवला होता. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला उन्हातान्हात मैल न् मैल प्रवास करावा लागत.

यातच आता नाशिकच्या देवळा तालुक्यातील पूर्व भागात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून, भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, देवळा तालुक्यातील पाच लघु पाटबंधारे कोरडेठाक झाले असून, या पाटबंधाऱ्यांवर अवलंबून तब्बल १६ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लगत आहे. देवळा तालुक्यातील हे पाच लघुपाटबंधारे हे चणकापूर आणि पुनद या दोन्ही धरणांच्या आवर्तनावर अवलंबून आहेत. (Water Shortage)

Water Shortage | नाशिकमध्ये पाणीबाणी; बघा कोठे किती पाणीसाठा..?

मात्र, यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने पाटबंधारे फेब्रुवारीमध्येच तळाला गेल्याने मागील दीड-दोन महिन्यांपासून या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजना या बंद पडल्या आहेत. देवळा तालुक्यातील एकूण २५ गावे, ३२ वाड्या-वस्त्यांवर सध्याच्या स्थितीला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्‍वर येथील किशोरसागर या धरणात ११ मे रोजी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. मात्र, असे असले तरी इतर तीन लघु पाटबंधारे हे कोरडेच राहणार असून, पुढील महिन्यात मात्र दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे आणि हे दुष्काळी रूप विद्रूप होणार आहे.

Water Shortage | ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण; ‘या’ गावात उद्भवली भीषण स्थिती

Water Shortage | लघु पाटबंधारे आणि योजना

  • वार्शी पाझर तलाव – खर्डे, वार्शी, रामेश्‍वर, वाजगाव, वडाळा
  • किशोरसागर धरण – रामेश्‍वर, गुंजाळनगर
  • करला पाझर तलाव – वाखारी, वाखारवाडी, गुंजाळनगर
  • देवदरा नागीण तलाव – पिंपळगाव
  • परसुल तलाव – कुंभार्डे, गिरणारे, सांगवी, तिसगाव, वराळे, उमराणे, चिंचवे, मेशी, खारीपाडा,

चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर

दरम्यान, केवळ पाणीच नाहीतर, सध्या जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्नही भीषण बनला आहे. पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासोबतच आता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे. यंदा पाणी कमी असल्याने पीकांचेही प्रमाण कमी आहे.

  • जनावरांची संख्या – ७७,२२३
  • गाय, बैल – ३२,९८४
  • म्हैस, रेडे – ४६१९
  • मेंढ्या, मेंढे – १०,५५८
  • शेळ्या, बोकड – २९,०७५