Subsidy | दूध उत्पादकांसाठी सरकारतर्फे अनुदान; मात्र अटी-शर्तींचा भडीमार


Subsidy | सध्या राज्यातील कृषी तसेच कृषी क्षेत्रानिगडीत व्यवसायांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. नागपुरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी २० डिसेंबर २०२३ रोजी पशुंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सहकारी दूध संघांना गाईच्या दुधाला प्रतीलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे.

दरम्यान, राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादक यास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून या योजनेंतर्गत राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील स्पष्ट केले आहे. तसेच यासाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट आणि 8.3 SNF करीता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध किंमत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रोख जमा करणं बंधनकारक असणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना राज्यसरकार मार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

मात्र ही घोषणा करताना या योजनेत अनेक अशा किचकट अटी आणि नियम घालण्यात आल्याने राज्यातील फारच कमी शेतकऱ्याना या अनुदानाचा लाभ मिळणार घेता येईल असे चित्र दिसत आहे. या योजनेतील पहिली अट म्हणजे राज्यातील सहकारी दूध संघांना दूध देणाऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू शकते मात्र किसान सभेचे अजित नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ७२ टक्के दूध हे खाजगी दूध संघामार्फत संकलित केले जात असते.

या योजनेतील अनुदानाची ही रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीनेच जमा केली पाहिजे तरच सरकारमार्फत ५ रुपये अनुदान हे बँक खात्यात जमा केले जाणार आहे. दरम्यान, या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्याचे बँक खाते हे त्यांच्या आधारकार्डशी तसेच पशुधनाच्या आधारकार्ड सोबत संलग्न असणे बंधनकारक आहे आणि त्यासोबतच या सगळ्या पुर्ततांची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. या एकंदर अटींमुळे ही प्रक्रिया आणखी किचकट होऊ शकते.

Subsidy | या योजनेचा कालावधी मर्यादित…

या योजनेतील हे अनुदान सध्या १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत दिले जाणार असून त्यानंतर संपुर्ण राज्यातील आढावा घेऊन या योजनेची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल. अलिकडच्या काही दिवसांत दुधाचे दर फार कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी हे मोठ्या अडचणीत आलेले असताना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती मात्र अनुदान देण्यासाठी घातलेल्या अटी आणि नियमांमुळे बहुसंख्य शेतकरी हे अनुदानापासून वंचित राहणार का ? हा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट या योजनेच्या अनुदानाचा लाभ द्यावा अशी मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.