Nashik Weather | महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; शेतकरी मात्र खुश..नेमकं कारण काय?


Nashik Weather | यंदा राज्यात पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही त्यामुळे यंदा राज्यात कमी प्रमाणात थंडी भासेल असा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जोरदार थंडी जाणवत आहे. अचानक वाढलेल्या हवेतील गारव्याने ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र दिसत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांंचा तापमानाचा पार हा दिवसेंदिवस घसरताना दिसत असून गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरांचे तापमान सातत्याने 10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचत आहे. आता याच संदर्भात हवामान विभागाने अपडेट जारी केले असून पुढील 48 तासांत संपुर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असून थंडीचा हा जोर वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे.

अचानक राज्यातील तापमान कमी होण्यामागे कारण काय?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अचानक थंडी जाणवण्यास सुरूवात झाली असून यामागील कारण म्हणजे अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे अचानक थंडीचा जोर वाढला आहे. सध्या उत्तरेकडे गार वारे वाहणं सुरु असून त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरु झाला असून या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढतो आहे.

Nashik Weather | थंडी वाढल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण

यंदा डिसेंबर महिना लागला तरीही दुसऱ्या आठवड्यापर्यंत नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत नव्हता. याचा मोठ्या प्रमाणात परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आसून नाशकातील तापमान 15 अंशापर्यंत घसरले आहे. जिल्ह्यातील वातावरणातील गारव्याचा फायदा हा रब्बी हंगामातील पिकांना होणार असून पिकांना पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे.

जिल्ह्यातील कोणत्या पिकांना पोषक वातावरण?

राज्यासह नाशिक जिल्ह्यातील वातावरण दिवसेदिवस थंड होत असून नाशिकचे तापमान १५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल झाल्याने शेतीपिकांना हे पोषक वातावरण निर्माण झालेले असताना नाशिकमधील वाढत्या गारव्याचा फायदा हा कांदा, गहू, हरभरा या पिकांना होताना दिसून येत आहे.