Onion News | कांदा निर्यातबंदीने बेरोजगारीचं चित्र होतंय आणखी विदारक…!


Onion News | 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि याच निर्णयाला राज्यासह नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कांदा निर्यातबंदीचा सर्वात मोठा परिणाम हा कांद्याच्या दरावर झाला असून कांदा निर्यातबंदीचा फटका हा शेतकऱ्यांना तर बसलाच मात्र या व्यवसायाशी निगडीत असलेले मजूर, शिपिंग एजंट त्यावर आधारित कामगार, ट्रकचालक, क्लिनर, सुरक्षारक्षक, संगणक ऑपरेटर अशा विविध तीस लाख लोकांवर बेकारीची दुर्दैवी वेळ आली आहे.

कांदा निर्यातबंदी केल्याने अनेक बाबींवर याचा परिणाम होताना दिसत असून यातच आता या व्यवसायाशी निगडीत असलेले मजूर, शिपिंग एजंट त्यावर आधारित कामगार, ट्रकचालक, क्लिनर अशा अनेक लोकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कांदा निर्यात करणाऱ्या कंटेनरवरील १४ हजार चालक आणि क्लिनरवर अचानक बेकारी आली आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते आणि कांदा निर्यातबंदीमुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून यामुळे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक आला आहे. महाराष्ट्रातून तब्बल तीन लाख टन कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होतो. मात्र या सर्व परिस्थितीने कांदा उत्पादक अडचणीत असताना आता कांद्यावर आधारित कामगार तसेच मजुरांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.

Onion News | केंद्रीय समिती नववर्षात महाराष्ट्र दौऱ्यावर

आता यावर एक उपाययोजना करत कामगार, ट्रान्सपोर्ट, शिपिंग अशा विविध संघटनांनी पुढाकार घेत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे या संपुर्ण परिस्थितीची कल्पना देत या संदर्भात नुकताच पत्रव्यवहार केला असून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय समिती या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नववर्षात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते यातच कांदा पॅकिंगसाठी जाळीच्या विविध आकारातील लाल बॅग बनविण्यात येतात. मात्र कांदा निर्यातबंदीमुळे सध्या फक्त देशांतर्गत कांदा वाहतूक केली जात असल्याने या बॅग बनविणाऱ्या कंपनीमधील जवळपास दीड लाख कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.

कांद्याचं सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या बॅग बनविणाऱ्या लहान-मोठ्या अशा एकूण पन्नास कारखान्यांमधील परिस्थिती सध्या अतिशय गंभार होत असून जिल्ह्यात सध्या बॅग बनविण्याचे काम फक्त दहा टक्के सुरू असल्याने नाशकात या व्यवसायातून महिन्याअखेरीस २० कोटीचा टर्नओव्हर अचानकपणे ठप्प झाला आहे.