Weather News | नाताळनंतर राज्यात थंडीचा जोर वाढणार; कुठे पाऊस तर कुठे धुक्याचा अंदाज


Weather News | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात हवामानात मोठा बदल झालेला दिसत असून सध्या हवेतील गारवा वाढत आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी थंडीदेखील कमी भासेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील थंडी वाढणार असून महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात अपेक्षित थंडी जाणवली नाही असं असताना गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात गार वाऱ्यासह थंडीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा घसरू लागला असून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात घसरण झाल्याचं चित्र आहे. आता पुढील काही दिवस मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. तसेच नाताळादरम्यान महाराष्ट्रातील तापमान हे वाढू शकते मात्र त्यानंतर राज्यातील तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे..

Weather News | नाताळानंतर राज्यात वाढणार गारवा

राज्यात आज आणि उद्या कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरडं वातावरण पहायला मिळणार आहे. यासोबतच पुढील सहा दिवस राज्यातात तापमान कोरडं राहणार असून उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम सध्या राज्यात जाणवताना दिसतो आहे. दरम्यान, नाताळाच्या दरम्यान राज्यात उबदार वातावरण पाहायला मिळू शकते तसेच 28 डिसेंबरनंतर मात्र राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

ही थंडी 24 डिसेंबर पर्यत कायम राहणार

विदर्भ, पूर्व-विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि प. महाराष्ट्र या पाच विभागात आणखी थंडी वाढणार असून दिवसा ढगाळ वातावरण मात्र रात्री थंडी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कालपासून उत्तरेकडील वारे सुरु झाल्याने भरदिवसाही थंडी जाणवत असून ही थंडी 24 डिसेंबर पर्यत कायम राहणार आहे. नाशिक, मुंबई, छ. संभाजीनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये थंडीसह दिवसा धुके पडण्याची शक्यता आहे. यातच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन हवामानतज्ञ पंजाब डख यांच्याकडून करण्यात आलं आहे.