Nashik News | नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’…


तनुजा शिंदे : Nashik News |  नाशिकच्या शेतकऱ्यांना यावर्षी कांद्याने प्रचंड रडवले आहे. एकतर आधी पावसाने दडी मारली. त्यानंतर हाती असलेल्या जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी पीकं उभी केलीत. तर, त्यातही आवकाळीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला. त्यांच्या डोळ्यासामोरच पीक वाहून गेले. त्यातूनही जे कांदे उरले. त्यांना केंद्राच्या ‘निर्यात बंदी’चा फटका बसला आणि या निर्णयानंतर कांद्याचे दर जोरदार वेगाने खाली आपटले. जे अजूनही वर सरकण्याचे नाव घेत नाही.

दरम्यान, आता एकीकडे संपूर्ण नशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्यांची लागवड सुरू असून, दुसरीकडे कांद्यांचे दर खाली आले आहेत. यात कमी की काय जे जिल्ह्यात आतापासूनच पाणी टंचाई भासू लागली असून, विहरींची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आता किमान हे पीक तरी हाताशी यावे. यासाठी शेतकऱ्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. कुठून तरी पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. यातूनच आता या जानेवारी महिन्यात नशिक जिल्ह्यात कूपनलिका तसेच विहिरी खोदण्याचे प्रमाण हे वाढले आहे. (Nashik News)

Nashik Weather | आज ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

Nashik News | दुष्काळात तेरावा महिना…

आतापासूनच पाण्याची कमतरता भासू लागल्याने ऐन उन्हाळयात आणि पुढील पावसाळ्यापर्यंत या पीकांसाठी पाणी कसे उभे करायचे ? असा प्रश्न आतापासूनच शेतकऱ्यांना भेडसावत असून, याचमुळे जिल्ह्यात आणि विशेषतः कसमादे पट्ट्यात बोअरवेल आणि विहिरी खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच कांद्याचे आपटलेले दर, निर्यात बंदी, त्यात आता पाणी टंचाई ही एकूण परिस्थिती म्हणजे नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी आहे. शेतकऱ्यांना या उन्हाळ कांद्यांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे महागडे बियाणे वापरून त्यांनी कांद्याची लागवड केली. मात्र, आता उन्हाळ्याला सुरुवातही झाली नाही आणि विहिरींची पाणी पातळी खालावल्याने उन्हाळ कांद्याला उन्हाची झळ बसत आहे.

Nashik Onion | कांदा प्रश्नावर राज्याच्या कृषीमंत्र्यांचा मोठा निर्णय

लाल कांदा ‘फेल’

जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन हे यशस्वीरित्या आले असले, तरी दर कोसळल्यामुळे त्याचा फार काही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. कसमादे पट्ट्याच्या पश्चिम भागात पाणी मुबलक प्रमाणात असले तरी, पूर्व भागात मात्र पाण्याची टंचाई भासत आहे. आता काहींनी शेतातील कांदापीक वाचविण्यासाठी तर काहींनी पुढे भासू शकणारी पाण्याची गरज ओळखून कुपनलिका खोदण्याचा एकच धडाका लावला आहे.(Nashik News)

काही शेतकरी हे विहिरीत आडवे बोअर मारत पाण्याचा शोध घेत आहेत. तर, काही शेतकरी विहिरी आणखी खोल खोदण्याचा प्रयोग करत आहेत. दरम्यान, कुठून तरी पाणी मिळावे यासाठीची ही शेतकऱ्यांची धडपड आहे. मात्र, आधीच पिकांना भाव नाही आणि त्यात या कामांच्या खर्चामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. तर, काही शेतकऱ्यांनी अक्षरशः कर्ज काढून ही कामे हाती घेतली आहेत. अशा प्रकारे नाशिकच्या शेतकऱ्यांची ही शेवटची आशा असलेले उन्हाळ कांद्याचे पीक वाचवण्याचे प्रयत्न सुरू असून, निदान उन्हाळ कांदा हाती येईपर्यंत तरी कांद्याची निर्यात बंदी हटावी अशी आशा आहे.(Nashik News)