Onion Export | नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदी हा प्रश्न हा पेटलेला असताना संपुर्ण नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी कांदा निर्यातबंदी या विषयावर आवाज उठवला मात्र हे सगळं पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे. आधी दुष्काळी परिस्थिती त्यानंतर अवकाळी आणि गोरपिटीने कांदा उत्पादकांना जगणं अवघड केलेलं असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर घणाघात घातला. आता हा निर्णय मागे घ्यावा अशी सातत्त्याने मागणी करून देखील सरकार जाणूनबुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
‘नाफेड’ने कांदा खरेदीसाठी 16 नेमलेल्या फार्माप्रोड्यूसर कंपन्यांच्या कामकाजात भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत असताना पिंपळगाव बसवंत बाजारसमिती येथील ‘नाफेड’ च्या कार्यालयाबाहेर सोमवारी (दि. ०१) ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत येथील ‘नाफेड’च्या कार्यालयावर थेट धडक दिली. २५ ट्रॅक्टरमधून ५०० क्विंटल कांदा घेऊन शेतकऱ्यांनी ‘नाफेड‘च्या कार्यालयाला मोठ्या प्रमाणात घेराव घातला.
Onion Export | नववर्षाच्या प्रारंभी पिंपळगाव बसवंत दणाणलं
१ जानेवारी २०२४ रोजी नाफेडच्या मनमानी आणि लुटीच्या विरोधात नाफेड कार्यालयावर हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणा बाजार समितीमधून शेतकरी मोर्चा धडकले यात कसमादे पट्ट्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. देवळा तालुक्यातील
शेतकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने ‘नाफेड’चे कार्यालय वर्षाच्या प्रारंभीच दणाणून गेलेले दिसले.
Onion Export | प्रहारतर्फे चांदवडमध्ये ‘सरण आंदोलन’
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना मारत या विरोधात १ जानेवारी २०२४ रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात चांदवड रेस्ट हाऊस ते चांदवड प्रांत कार्यालय अशी प्रतीकात्मक प्रेतयात्रेचा सरणविधी अशा रितीने आंदोलन करण्यात आलं. ‘व्यवस्थेने नडलेल्या आणि सरकारच्या धोरणांनी पिडलेल्या शेतकऱ्याच्या मयतीला चला’ असं आवाहन यावेळी चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलं होतं.
७ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आणि त्याचवेळी कांदा उत्पादकांच्या शरीरातील प्राण गेला. कांदा उत्पादकांच्या आर्थिक स्वातंत्र्याची कोंडी केली त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक प्राण मेला. यामुळे या मेलेल्या प्राणरुपी शरीराला अंत्यसंस्कार करण्याची गरज आहे म्हणुन हा अंत्यविधी सोहळा विश्रामगृह चांदवड ते प्रांत कार्यालय काढणार आला. तसेच या ठिकाणी सरण रचून हे नाशिक प्रहारतर्फे हे सरण आंदोलन करण्यात आलं.
कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत असून याचा मोठ्या प्रमाणात फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. या निर्यातबंदी विरोधात शेतकरी आक्रमक होत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली मात्र तरीही कांदा निर्यातबंदीवर तिळमात्रही परिणाम झाला नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय. कांदा निर्यातबंदीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी किती लढावं लागणार? हे पाहणं महात्वाचं असेल.