Igatpuri | वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; वीज पडून दोन जनावरांचा मृत्यु


राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |   इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात शनिवार (दि.११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह नशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसाने टाकेद परिसरातील पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणी, धामणगाव, अडसरे, खेड, परदेशवाडी, वासाळी, सोनोशी, धानोशी, बारशिगवे, इंदोरे, खडकेद, अधरवड या परिसरात मोठे थैमान घातले असून, जवळपास दोन तीन तास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेची झाडे उनमळूण पडली आहेत. (Igatpuri)

 रस्त्यात झाडे कोलमडल्याने काही काळ या रस्त्यांवरून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर शेतकऱ्यांची बागायत पिके, उन्हाळ कांदा, गुरांची जनावरांची वैरण, पेंढा झाकण्यासाठी पुरती भांबेरी उडाली. तर अनेक ठिकाणी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांनाही वाहने चालवताना अडथळे निर्माण झाले.

Bhendval Ghat Mandni | अवकाळी पाऊस अधिक; काय आहे भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज

Igatpuri | वीज पडून गाय व म्हैस ठार 

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे टाकेद खुर्द येथील शेतकरी गोपीनाथ लगड यांच्या झापवस्तीवर वीज पडून एक गाय व एक म्हैस जागीच ठार झाल्या आहेत. वीज पडून मृत्युमुखी पडलेले गाय व म्हैस या गाभन होत्या या घटनेमुळे शेतकरी गोपीनाथ लगड यांचे अंदाजे दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे टाकेद खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वीज पडून जागीच ठार झालेल्या या मुक्या जीवांमुळे शेतकरी गोपीनाथ लगड यांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी सर्व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान शनिवारी सायंकाळी सहा ते सात वाजे दरम्यान या परिसरात वीज पडून जोरदार अतिवृष्टी झाली. तर, रविवारी सकाळी टाकेद येथील तलाठी कार्यालयाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला. यात एक लाख पन्नास हजार रुपयांची म्हैस व पंच्यात्तर ते ८० हजार असे जवळपास दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे एकूण नुकसान झाले असे तलाठी पंचनाम्यात म्हंटले आहे. यावेळी सरपंच सचिन बांबळे, पोलीस पाटील शरद निर्मळ, बाळू नांगरे, नामदेव लहामगे, संजय लगड, राहुल लगड, कचरू काळे आदींसह पंच, ग्रामस्थ उपस्थित होते. (Igatpuri)

Unseasonal Rain | राज्यात गारपीटीसह तूफान पाऊस; उभे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले..!

वीजपुरवठा खंडित 

या अवकाळी पावसामुळे टाकेद परिसरात 33 के व्ही लाईटमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्रभर इगतपुरीचा पूर्व भाग टाकेद परिसर पूर्णपणे अंधारात राहिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे टाकेद परिसरातील अनेक ठिकाणी घरांची छपरे उडाली. तर, अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा भिजला, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे आणि वीटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

घराचे पत्रे उडाल्याने अन्न धान्याचे मोठे नुकसान

यासोबतच बेलगाव तऱ्हाळे येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे टाकेद येथील शेतकरी राजू गोडे यांच्या झापवस्तीवरील घराचे पत्रे उडाल्याने घरातील अन्न धान्याचे मोठे नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे टाकेद परिसरात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई साठी मदत द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, मनसे गटप्रमुख अशोक गाढवे, किरण साबळे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.