Weather Update | सध्या भारतात थंडीचा कहर सुरू असून देशातील शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवसांत उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवेतील गारवा आणि दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील मैदानी भागात पुढील 02 दिवसांत तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात पुढील 05 दिवसांत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असून सध्या बहुतांश भागात किमान तापमान 2-5°C च्या दरम्यान घसरले आहे. मंगळवारी पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्लीच्या अनेक भागात थंडीची लाट वाढली असून पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशातील विविध भागात थंडीने कहर केला आहे. तसेच पंजाबच्या बहुतांश भागात दाट ते दाट धुके दिसून येत आहे.
Weather Update | नाशिक जिल्ह्यात अचानकपणे थंडीचा कडाका वाढला
दरम्यान, महाराष्ट्रासह नाशिक शहर तसेच जिल्ह्यात मंगळवारी अचानकपणे थंडीचा कडाका वाढल्याचं दिसून आलं. नाशिक जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस घसरण होत असून या हंगामातील सर्वांत नीचांकी 9.8 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. तर निफाडमध्ये देखील हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून निफाडच्या गहू संशोधन केंद्रावर आज 7.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे.
Weather Update | द्राक्ष उत्पादकांची चिंता आणखी वाढली
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारपासून आठवडाभर राज्यात थंडीचा कहर आणखी वाढणार असून मागील तीन दिवसांत नाशिकच्या तापमानात थेट सहा अंशांनी घसरण झाल्याने वाढत्या थंडीने नाशिककर चांगलेच गारठले आहेत. मात्र या वाढत्या थंडीमुळे जिल्हयातील द्राक्ष, कांदा, गहू उत्पादकांची चिंता आणखी वाढली आहे.