Weather News | मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणीवर


Weather News | गेली काही वर्षे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास लांबल्याचे दिसून आले आहे. यावर्षी देखील मॉन्सूनने राजस्थानातून परतीचा प्रवास अद्यापही सुरू केलेला नाही. पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड सारख्या वायव्य भागातून मान्सूनच्या परतीसाठी अजूनही पोषक स्थिती नाही. तेव्हा वायव्य भारतात पावसाने उघडिप दिल्यानंतर मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 25 सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानहून माघारी फिरले होते.

Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान; पुढील 2 दिवसात पावसाच्या सरींचा अंदाज

भारताच्या वायव्य भागात पावसाने सलग पाच दिवस विश्रांती घेऊन आद्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान निर्माण होते व वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मध्य भागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारे क्षेत्र तयार होणे आवश्यक असते. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर केले जाते.

मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने

2020 मध्ये हवामान विभागाने मॉन्सून आगमन ते परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांची नवे वेळापत्रक जारी केले होते. त्यामुळे मॉन्सून परतीची लांबणारी वाटचाल लक्षात घेत 17 सप्टेंबर ही मॉन्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर ही मॉन्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख होती. परंतु सध्या राजस्थानसह, वायव्य भारतामध्ये वातावरणात बाष्प अस्तित्वात असल्याकारणाने हलक्या स्वरूपात पाऊस सुरू आहे. परिणामी मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून आधीच जाहीर केले गेले होते.

Weather Update | पावसाने घेतली विश्रांती; राज्यात आज पावसाच्या तुरळक सरी

मान्सूनच्या वाटचालीवर ‘रेमल’ चक्रीवादळाचा प्रभाव

यावर्षी मॉन्सूनने केरळमध्ये 30 मे रोजी हजेरी लावली. अंदमान निकोबार बेटावरती 19 मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनवर ‘रेमल’ चक्रीवादळाचा प्रभाव पडला. त्यामुळे बंगालच्या उपसागरातील वाटचाल मंदावली, मात्र अरबी समुद्रातून प्रगती करत मॉन्सून 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर 23 जून पर्यंत मॉन्सून ने महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर मोसमी वारे मजल दरमजल प्रवास करीत 2 जुलै रोजी संपूर्ण देशात दाखल झाले. यावर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास मात्र लांबणीवर पडला आहे. (Weather News)