राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | एकीकडे दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे घोटभर पाण्याच्या शोधार्थ भर उन्हातान्हात होत असलेली महिलांची पायपीट ही परिस्थिती जणू दुष्काळाची जाणीव करून देत आहे. इगतपुरी तालुका म्हटला की पावसाचे माहेरघर, धरणांचा तालुका, मुंबईचे प्रवेशद्वार, भाताचे कोठार, पर्यटनाचे ठिकाण अशा विविध नावाने राज्यात इगतपुरी तालुक्याची एक वेगळी ओळख आहे.
परंतु याच धरणाच्या तालुक्यात ग्रामीण भागात डोंगर दऱ्यांमध्ये रहिवास असणाऱ्या परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा पहावयास मिळत आहे. इगतपुरी तालुक्यात छोटे मोठे दहा पंधरा धरणे असूनही याच धरणांच्या तालुक्यात पाणी टंचाई निर्माण व्हावी आणि मुक्या प्राण्यांसह ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. (Water Scarity)
धरण उशाला अन कोरड घशाला
याचा अर्थ म्हणजे “धरण उशाला अन कोरड घशाला” अस म्हटलं तरी काही वावगे ठरणार नाही. याचीच प्रचिती म्हणजे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, बोरीचीवाडी, मायदरा, धानोशी, ठोकळवाडी, चौराईवाडी, तातळेवाडी, अडसरे, टाकेद बांबळेवाडी, घोडेवाडी, सोनोशी, बारशिगवे, राहुलनगर, इंदोरे, खडकेद, उंटवाडी, वासाळी कचरवाडी, आदी परीसरात गेल्यावर नक्की येते. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील घोटी सिन्नर हायवे लगत असलेले पिंपळगाव मोर हे गाव दारणा धरणाच्या कडेला असूनही या गावातील महिला भर उन्हातान्हात डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहताना दिसत आहेत.(Water Scarity)
Igatpuri | वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; वीज पडून दोन जनावरांचा मृत्यु
Water Scarity | मुक्या प्राण्यांचे पाण्यावाचून हाल
एकीकडे माणसांनाच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुक्या प्राण्यांचा पशुधनाचा पिण्याच्या पाणी प्रश्न देखील तितकाच गंभीर होऊन बसला आहे. या परिसरातील मुक्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर पाण्यावाचून हाल होत आहे. या परिसरातील गायी वासरे सांभाळणारे शेतकरी भीषण उन्हात शेकडो मैल दूर जिथे पाणी उपलब्ध आहे अश्या ठिकाणी या मुक्या जीवांची तहान भागवत आहे. तर याच परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी हात पंपावर, विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे.(Nashik News)
शासनाचा उद्देश ग्रामीण भागात पूर्णत्वास गेला का..?
अनेक ठिकाणी विहिरींना तळ गाठला असून हातपंपदेखील कमी पडले आहेत. तर एकीकडे सरकार ग्रामीण भागात जीवन प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन, हर घर नल का जल उपक्रम राबवत आहे. याची सोशल मीडियावर अनेकदा जाहिरात बघावयास मिळते. परंतु हा शासनाचा उद्देश ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेला का..? याचा ग्रामीण जनतेला फायदा झाला का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Water Scarity)
Water Shortage | देवळ्यातील दुष्काळाची दखल घेत अकरा दिवस आधीच पाणी सोडले
कधी बदलणार ही परिस्थिती..?
तरी या भीषण पाणी टंचाईला जबाबदार कोण..? अशी परिस्थिती निर्माण झाली का ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हातान्हात लाहीलाही करत रानोमाळ भटकंती करत हिंडण्याची वेळ येते कधी बदलणार ही परिस्थिती..? निवणुका येतील आणि जातील. परंतु या भागातील पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. तरी शासनाकडून लक्ष्य केंद्रित करून ही परिस्थिती बदलविण्याची अपेक्षा या भागातील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.(Igatpuri)