Ram Temple | उद्या (दि. २२) रोजी अयोध्येतील रामलल्ला मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून संपुर्ण देशभर यामुळे भक्तिमय वातावरण पसरले आहे. यातच महाराष्ट्रातून देथील अनेक उपहार आतापर्यंत अयोध्येत प्रभू श्री रामांसाठी पाठण्यात आले असून आता महाराष्ट्रातून पाठवलेल्या साडेसात हजार वनस्पतींच्या सौंदर्याने श्री रामजन्मभूमी मंदीर अगदी भव्यदिव्य दिसू लागले आहे.
उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 8 हजारांहून अधिक मंडळी श्री रामजन्मभूमी संकुलातील अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी श्री रामजन्मभूमी संकुलातील हिरवाई आध्यात्मिक उर्जेसह भाविकांना मोहित करणार आहे.
Ram Temple | या कुंड्यांमध्ये विविध प्रकारची देशी-विदेशी फुले
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश वन विभागाच्या वतीने श्री रामजन्मभूमी संकुल येथे अभिषेक कार्यक्रमासाठी रोपे असलेली साडेसात हजार कुंड्यांची सजावट करण्यात येत असून या कुंड्यांमध्ये विविध प्रकारची देशी-विदेशी फुले आहेत. उद्याच्या श्री रामलल्ला यांच्या अभिषेक प्रसंगी संपूर्ण संकुल सजवले जात असून फुलांच्या सजावटीबरोबरच येथे कुंड्याही बसविल्या जात आहेत.
या सजावटीसाठी महाराष्ट्रातून साडेसात हजारांहून अधिक कुंड्या आणि झाडे पाठवण्यात आली असून राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश वनविभागाच्या वतीने या परिसरात सजावट करण्यात येत आहे. या रोपांमुळे संपुर्ण राम मंदिर कॅम्पसची भव्यता वाढणार आहे. श्री राम मंदिर परिसरात ५६ प्रजातींची रोपे लावली जात असून यामध्ये अनेक वेगवेगळ्या फुलांच्या प्रजातीची निवड करण्यात आली आहे.
Ram Temple | नक्षत्र वाटिकेचे सौंदर्यही थक्क करणारे
श्री रामजन्मभूमी संकुलातील स्थापन झालेल्या नक्षत्र वाटिकेचे सौंदर्यही थक्क करणारे असून हिरवाई लक्षात घेऊन नक्षत्र वाटिकेत तयार केलेली झाडे या ठिकाणचे सौंदर्य आणि वातावरण भव्यदिव्य करत आहे. श्री रामजन्मभूमी संकुलात रामायण काळातील वैभव दाखविणाऱ्या नक्षत्र वाटिकेत २७ नक्षत्रांशी संबंधित २७ झाडे ठेवण्यात आली आहेत.