Onion News | देशातील महत्त्वाच्या पिकांपैकी एक असलेले पिक म्हणजे कांद्याचे पीक आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांदा विशेष चर्चेत असतो. त्यात कांदा बाजारभाव, निर्यात बंदी या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते आहे. त्यामुळे कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीची मागणी करण्यात आली आहे.
Onion Rate | निर्यात दर कमी झाल्याने फायदा शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना?
देशामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त कांदा उत्पादन घेतले जाते. खरीप, लेट खरीप व रब्बी अशा एकूण तीन हंगामात महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी कांदा बियाणांपासून ते कांदा विक्रीपर्यंत विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पाश्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कायद्यांच्या संदर्भात दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळाची एक विशेष बैठक आयोजित करण्यात यावी. अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयात पाठविले आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कांदा पिकवला जातो. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला दरवर्षी नियमितपणे उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेसह, जागतिक बाजारपेठेत देखील सातत्यपूर्ण कांदा पोहोचणे गरजेचे आहे.कांदा बियाणांपासून ते कांदा विक्रीपर्यंत राज्य सरकारकडून कायमस्वरूपी निश्चित कांदा धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरिता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आणि सूचना आहेत. त्या जर प्रत्यक्षात अमलात आणल्या तर कांदा प्रश्न हा शेतकऱ्यांसाठी ग्राहकांसाठी व सरकारसाठी निश्चितच सुलभ होईल.
याकरिता संघटनेचे भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रराज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेट घ्यायची आहे. तरी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी वेळ देण्यात यावी ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे अशा आशयाचा मजकूर असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आले आहे. (Onion News)