Farmers Technology | आता सातबारासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही…


Farmers Technology | जमिनीचा सातबारा उताऱ्यात तुमच्या जमिनीचे मालकी हक्क, जमिनीचा प्रकार आणि क्षेत्रफळ, जमीन किंवा शेतजमीन विक्री-खरेदी व्यवहाराच्या नोंदी करण्यात आलेल्या असतात. एकंदर हा उतारा जमिनीचा इतिहास तसेच सध्याचे मालकी हक्क सांगतो. तसेच, त्यात भूमापन क्रमांक, गाव, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती ही नमूद केलेली असते. महाराष्ट्र महसूल कायदा १९७१ या कायद्याच्या अंतर्गत जमिनीबाबतच्या संपुर्ण नोंदी ठेवल्या जातात. राज्यात अधिकारी-तलाठीला भेटून किंवा महाराष्ट्र महाभुलेखच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही 7/12 उतारा online काढू शकतात. 

मात्र आता जमिनीचा सातबारा काढण्यासाठी ई-फेरफार प्रकल्पांतर्गत अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नं. ७/१२, ८-अ संगणकीकृत करण्यात आले असून संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांची नक्कल फी शासनाने निश्चित केलेली आहे. त्यानुसार सेतू/ आपले सरकार सेवा केंद्र / महा-ई सेवा केंद्र यांच्यामार्फत जमिनीचा सातबारा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे.

अशी असेल सेवा शुल्काची विभागणी

महा-ई सेवा केंद्र, आपले सरकार, सेतू केंद्र यांसारख्या संस्थाकडून प्रचलित सेवाशुल्क आकारणी १५ रुपये तसेच अधिक ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्क १० रुपये अशी ठेवण्यात आली आहे. तर सदरचे ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्क सातबाऱ्यामध्ये अतिरिक्त पृष्ठ असल्यास प्रतिपृष्ठ २ रूपये एवढे अतिरिक्त सेवा शुल्क केंद्रचालकास घेता येऊ शकते. आता जमिनीचा सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे यात वेळ तसेच पैशांची मोठी बचत होणार आहे.

Farmers Technology | ई सेवा केंद्रावर काढता येणार २५ रुपयांत सातबारा

पूर्वी अधिकारी-तलाठीला भेटून किंवा महाराष्ट्र महाभुलेखच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही 7/12 उतारा online काढू शकत होते. तसेच अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकांना तलाठी कार्यालयात समक्ष अर्ज कागदपत्रासह दाखल करावा लागत असे मात्र आता ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. दरम्यान, कोणत्याही खातेदार नागरिकांना फेरफारसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ई-हक्क प्रणालीद्वारे थेट संबंधित तलाठ्यांकडे कागदपत्र ऑनलाईनच्या माध्यमातून दाखल करता येणार आहेत.

यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

या प्रणालीसाठी सोसायटी ई-करार, बँकेची प्रत आणि गहाण खताची प्रत, लागतील तसेच वारस नोंद करण्यासाठी मृत्यू दाखला सत्यप्रत, अर्जदाराचे ओळखपत्र अशा संदर्भातील कागदपत्रे लागतात.