El-Nino | 2024 मध्ये देशात दुष्काळ? काय आहे नेमकं कारण?


El-Nino | उद्या नववर्षाची सुरूवात होणार असून या निमित्ताने देशात अनेक घडामोडींना वेग आलेला आहे. यातच एक धक्कादायक माहीती समोर येत असून या नववर्षात देशात दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या नोआ म्हणजेच National Oceanic and Atmospheric Administration या संस्थेनं हा अंदाज वर्तवलेला आहे.

यंदा देशासह राज्यात पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने यंदा या अत्यल्प पावसाचा परिणाम अनेक बाबींवर होताना दिसत आहे. आता अमेरिकेच्या नोआ म्हणजेच National Oceanic and Atmospheric Administration या संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार, जगाला ‘सुपर एल निनो’चा फटका 2024 मध्ये मार्च ते मे या कालावधीत जोरदार जाणवण्याची शक्यता आहे.

El-Nino | एल निनो म्हणजे नेमकं काय?

एल-निनो म्हणजे प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय स्थिती असून जेव्हा प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा वाढत असते तेव्हा त्या स्थितीला एल निनो असं संबोधलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सर्वसाधारणपणे 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं आणि जेव्हा हे तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाते तेव्हा या स्थितीला सुपर एल निनो असे संबोधले जाते.

भारतीय मान्सूनचा आणि एल निनोचा परस्पर संबंध

भौगोलिक दृष्ट्या, जगातील सर्वांत मोठा महासागर प्रशांत महासागर असून यामुळे या महासागरात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जगातील हवामानावर होत असतो. यापुर्वी, जेव्हा देशात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे तेव्हा बहुतांश वेळी वातावरणात एल निनो सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारतीय मान्सूनचा आणि एल निनोचा परस्पर संबंध असल्याने देशात मार्च ते मे दरम्यान उन्हाळा असतो आणि याच कालावधीत एल निनो तीव्र स्थितीत पोहचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे देशातील अनेक भागात दुष्काळ स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे देशातील शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढलेली आहे.

२०२४ मधील पावसावर काय परिणाम होणार?

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मते, २०२४ च्या येत्या काळात देशात फार मोठा दुष्काळ पडेल ही जी भीती वर्तवण्यात येत आहे ती पूर्णतः बरोबर नसून याचं मुख्य कारण म्हणजे फक्त एल निनो हा एकच फॅक्टर दुष्काळाला कारणीभूत नसतो तर या बरोबर हवामानातील बदल हे फॅक्टर देखील दुष्काळ स्थिती निर्माण करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत.