Rain Update | राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढचे 2 दिवस बसरणार मुसळधार पाऊस


Rain Update | यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा परिणाम थंडीवरदेखील झालेला जाणवला. सध्या अनकाळी, गारपीट मग हवेतील गारवा या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडगार हवा जाणवू लागली आहे.

यंदा कमी पाऊस झाल्याने याचा परिणाम थंडीवर होईल असा अंदाज हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आला होता. दरम्यान, डिसेंबरच्या अगदी प्रारंभात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि मोठा अवकाळी पाऊस बरसला होता मात्र आता चक्रीवादळ पूर्णपणे निवळले असून याचाच परिणाम म्हणून आता महाराष्ट्रातील गाराठा वाढू लागला आहे. (Rain Update)

उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा घसरू लागला असून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात घसरण झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान निवळत असून हवेतील गारवा वाढत चालला आहे.

राज्यातील अनेक भागात थंडीची चाहुल लागलेली असताना काही जिल्ह्यात किमान तापमान हे १५ अंशांच्या खाली उतरलेले आहे. अशातच महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असून राज्यातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Rain Update | अवकाळी बरसण्यामागे कारण काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रातील हवामानात गारठा वाढलेला दिसत असला तरी देखील येत्या काही तासांत राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, सांगली, कोल्हापूर अशा एकूण 5 जिल्ह्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे.त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.