Rain News | राज्यातील वातावरणात बदल होत असून मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आठवाजेपर्यंत जालन्यातील गोंदी येते सर्वाधिक 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने खरिपातील काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण असून दिवसभर कडक उन, तर संध्याकाळी वातावरणात बदल होत आहे. अचानक ढग भरून येत असून जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. श्रावण येथे सर्वाधिक 72 मिलिमीटर पाऊस पडला असून पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना दिलासा असा मिळाला आहे. तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असून पावसामुळे ओढे, नाल्यांच्या पाणी प्रवाहात काहीशी वाढ झाली आहे.
Weather Update | राज्यात आज पावसाचा यलो अर्लट
पावसामुळे हवेत गारवा
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून जिल्ह्यातील येवळी येथे 74 मिलिमीटर तर तासगाव 67, बेडगमध्ये 66 मिलिमीटर इतका पाऊस झाला. सोमवारी जिल्ह्यातील विविध भागात सकाळी पाऊस, दुपारनंतर ढगाळ वातावरण तर कधी ऊन असे चित्र होते. कोल्हापूरात पाऊस सुरूच असून जयसिंगपूर, हातकणंगले, नृसिंहवाडी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर साताऱ्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. सोलापुरात तुरळ ठिकाणी पाऊस पडला असून नगरमध्ये शेवगाव तालुक्यात दोन ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून उर्वरित भागात पावसाने उघडिप दिली. नाशिकच्या निफाड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील थेरगाव परिसरात साधारण एक तास मुसळधार पाऊस पडला असून भाजीपाला लागवडीत पाणी साचले होते. पुणे जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. भोरमधील वेळू येथे 44 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. राज्यभरात पडलेल्या या पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला असला तरी अनेक ठिकाणी पिकांच्या काढणी केलेल्या बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांच्या नुकसानीसाठी हे हवामान कारणीभूत ठरत आहे.
Weather News | आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट
पावसामुळे पीकं धोक्यात
मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी-जास्त असून छत्रपती संभाजी नगरमधील आपेगाव येथे 64 मिलिमीटर तर पैठणमध्ये 41 मिलिमीटर, जालन्यातील गोंधीनंतर सुखापुरी येथे 56 मिलिमीटर तर परभणीतील कासापूर येथे 46 मिलिमीटर पाऊस पडला. बीडमध्ये देखील जोरदार पाऊस झाला असून कावडगाव येथे 79 मिलिमीटर पाऊस पडला. तर इतर भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या. विदर्भातील वाशिममधील मालेगाव येथे सर्वाधिक पाऊस पडला असून या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या तूर, कापूस पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने सोंगणी केलेल्या सोयाबीन सुड्या ओल्या झाल्या असून पीक वाचवण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. अमरावतीतील पळसखेड, मंगरूळ येथेही जोरदार पाऊस झाला. तर यवतमाळ मधील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. चंद्रपुरातील खांबडा येथे देखील मुसळधार पाऊस पडल्याने ओढे नाले भरून वाहिले. तर वर्धा जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.(Rain News)