Nashik Onion | केंद्राकडून कांद्यावर 7 डिसेंबर रोजी निर्यातबंदी लावण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह 17 बाजार समित्यांमधील कांद्याचे भाव कोसळले त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कांदा प्रश्न नाशिकमध्ये जोरदार पेटलेला आहे.
कांदा निर्यातबंदीच्या आधी ज्या कांद्याला तीन ते चार हजारांच्या घरात भाव मिळत होता. त्यानंतर मात्र दरांमध्ये सारखीच घरसण होत गेली आणि आता त्याच कांद्याचा भाव आता खाली उतरले असून, आज लासलगाव बाजार समितीमध्ये सुरुवातीला कमीत कमी ८००, जास्तीत जास्त २३०० आणि सरासरी २१०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभव मिळावा तसेच कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने उठवण्यात यावी. यासाठी आज येथील संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले आहेत.
Nashik Onion | प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू थेट बांधावर
दरम्यान काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटले होते तसेच यावेळी राष्ट्रवादीकडून कांदा निर्यातबंदी विरोधात चांदवड मध्ये आंदोलनही करण्यात आलं. दरम्यान, काल दिव्यांग कल्याण राज्य समिती तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी चांदवड मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कांद्याची निर्यातबंदी करत केंद्र सरकारने एका रात्रीतून ट्रॅक्टरमागे हजारो रुपयांचे नुकसान केलं अशी व्यथा बच्चू कडू यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस, दुष्काळ आणि अवकाळी यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले कि, आमची आर्थिक परिस्थिती वाईट झाली असून आता तुम्ही काही तरी करावं असं शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना सांगितले.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्षांसह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट दिली असून पंचनामेही झाले आहेत. आता सर्व शेतकऱ्यांची नजर सरकारच्या घोषणांकडे लागलेली आहे.