Winter Diseases | हिवाळ्यात फुफ्फुस खराब होण्याचा धोका जास्त; काय आहेत नेमकी कारणं?


Winter Diseases | हिवाळ्याचा ऋतू आरोग्याशी संबंधित अनेक आजार घेऊन येत असतो आणि जसजसे हवामानात थंडावा वाढतो तसतसे शरीराच्या अनेक भागांवर परिणामही होतो. मात्र काही अवयव इतर अवयवांपेक्षा जास्त प्रभावित होतात आणि त्यापैकी एक म्हणजे फुफ्फुस आहे. हिवाळ्यात तुमच्या फुफ्फुसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण हिवाळ्यात थंडीचा थेट परिणाम तुमच्या फुफ्फुसांवर होत असतो. विशेषत: यामध्येदेखील आपल्याकडून काही चुका होऊ शकतात आणि या चुका वेळीच ओळखल्या गेल्या तर फुफ्फुसांना इजा होण्यापासून वाचवता येऊ शकते. (Winter Diseases)

हिवाळ्यातील कोरडी हवा हानिकारक

हिवाळ्याच्या हंगामात कोरडी हवा वाहत असते जी या हंगामात आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठा शत्रू मानली जाते. कोरडी हवा तुमच्या त्वचेला तर हानी पोहोचवतेच मात्र श्वासोच्छवासासोबत शरीरात जाण्याने फुफ्फुसांनाही हानी पोहोचवत असते. कोरड्या हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने मानवाला खोकला, घरघर आणि फुफ्फुसाचे इतर आजार होऊ शकतात.

गार वाऱ्याचा परिणाम

हिवाळ्यातील हवा केवळ कोरडीच नाही तर गारही असते आणि श्वासोच्छवासाद्वारे ही हवा थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचत असते. अती थंडीमुळे फुफ्फुसात श्लेष्मा जमा होऊ लागतो किंवा घट्ट होऊ लागतो ज्यामुळे इतर अनेक समस्या निर्माण होत असतात. पातळ श्लेष्मा एकाच वेळी बाहेर पडत राहतो मात्र जाड श्लेष्मा जमा होऊन फुफ्फुसांना हानी पोहोचवणारे अनेक रोग तयार करू शकतो.

प्रदुषणाचा परिणाम

सध्या वाढत असलेले वायू प्रदूषण आपल्या फुफ्फुसांना थेट हानी पोहोचवते आणि हिवाळ्यात हवेतील प्रदूषण लक्षणीय वाढत असते. ज्यामुळे फुफ्फुसांना नुकसान होण्याचा धोका देखील वाढतो आणि खरं तर हिवाळ्यात वारा मंद गतीने वाहतो त्यामुळे हवेतील प्रदूषणाचे कण हवेत बराच काळ राहतात, जे आपल्या फुफ्फुसासाठी हानिकारक असतात.

आहार योग्य असावा

हिवाळ्यात आपली फुफ्फुस खराब होण्याचा धोका जास्त असतो आणि याचे कारण चुकीचा आहारही असू शकतो. हिवाळा आला की आपल्या आहारात देखील मोठा बदल होतो ज्याचा थेट परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होत असतो. हिवाळ्यात आपण अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतील आणि त्याचबरोबर तुमच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे काही प्रमाणात संसर्गचा धोका कमी होऊ शकतो.