Nashik Rain | देवळा तालुक्यात जोरदार पाऊस; गिरणा नदीला पुर, दोन गावांचा संपर्क तुटला


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यात कालपासून सर्वदूर जोरदार पाऊस बरसत असून या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली व रात्री पावसाचा जोर वाढला. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने गिरणा नदी दूधडी भरून वाहत असून, नदीला पूर आल्याने नदीलगत असलेल्या विठेवाडी शिवारातील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खर्डे परिसरात आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कळवण तालुक्यातील गिरणा, पुनद नदीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गिरणा नदी यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा दुथडी भरून वाहत असून लोहोणेर येथील गिरणा नदीच्या पुलावर पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. गेल्या दोन दिवसांपासून कळवण, देवळा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Nashik Rain | नाशकात पावसाची जोर’धार’; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

Nashik Rain | चणकापूर, पुनद धरणातून विसर्ग सुरू

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली असली तरी देवळा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र कालपासून पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. चणकापूर धरणासह पुनद धरणाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने चणकापूर धरण ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरले असून धरणातून पाणी सोडले जात आहे. काल सायंकाळी सहा वाजता चणकापूर धरणातून १७ हजार १९२ क्युसेक तर पुनद मधून ७ हजार ३० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून ते पाणी मोठ्या प्रमाणात गिरणा नदीला येऊन मिळाल्याने लोहोणेर, ठेंगोडा येथे गिरणा नदीतून अधिकचा विसर्ग होत आहे.

Deola | शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचे देवळ्यात लाक्षणिक उपोषण

विठेवाडी – सावकीचा संपर्क तुटला

विठेवाडी – सावकी दरम्यान असलेला गिरणा नदीवरील पूल पूर्ण पाण्याखाली गेला असून विठेवाडी – सावकीचा संपर्क तुटला आहे. गिरणा नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी लोहोणेर पुलावर एकच गर्दी केली होती. दरम्यान चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडल्याने रामेश्वर धरण भरण्यास मदत होणार आहे. चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने गिरणा नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महसूल यंत्रणेसह पोलीस यंत्रणा परिस्थितीवर पूर्णतः नियंत्रण ठेवून आहे.