Nashik Agro | यंदा महाराष्ट्रात झालेल्या अत्यल्प पावसाने शेती उत्पादनांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून यानंतर नाशिक जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे गव्हाच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात गव्हाचा पेरा तब्बल 60 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे यंदा मध्यप्रदेश हे गव्हाचे मुख्य आगार असून येथील येणाऱ्या गव्हावरच महाराष्ट्रातील नागरिकांना अवलंबून राहावं लागू शकतं, असं चित्र सध्या दिसत आहे.
गहू म्हणजे महाराष्ट्रासह देशातील प्रमुख अन्न आहे मात्र यंदा गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून आता रोजच्या आहारात असलेल्या गव्हाची चपातीचा आटाही यामुळे महागणार असल्याची चिन्हं स्पष्ट होत आहेत. रब्बी हंगामात नाशिक जिल्ह्यासह राज्यातील इतर भागात गहाचा पेरा मागील वर्षापेक्षा निम्म्यावर आला असून यामुळे फेब्रुवारीपासून नवीन गव्हाला 2900 ते 3200 रुपये क्विंटलप्रमाणे दर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Nashik Agro | जिल्ह्यात गव्हाचं उत्पादन घटलं….
नाशिक जिल्ह्यात यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे याचा परिणाम जिल्ह्यातील खरीप हंगामावर झाला तसेच मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने जिल्ह्यातील अनेक पिकं झोपवलीत. दरम्यान, यासर्व संकटांमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेती उत्पादनांवर परिणाम झाला. यातच, नाशिक जिल्ह्यात या रब्बी हंगामात 64 हजार 150 हेक्टरवर गव्हाचा पेरा होणार होता मात्र तो घटून फक्त 22 हजार 552 हेक्टरवर झाला आहे. म्हणजेच जवळपास 60 टक्के गव्हाची लागवड यंदा जिल्ह्यात घटली आहे.
सध्या बाजारात भाज्यांसह तांदुळ, फुलं, लसून यासारखी अनेक उत्पादने महागली असताना यातच जेवणातील पोळी महागणार असं चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि पेठ तालुक्यात गव्हाच्या 57 टक्के पेरण्या झाल्या तर निफाड तालुक्यातील 578 हेक्टरवरील गव्हाच्या लागवडीला नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने चांगलच झोडपून काढलं. आता या सगळ्याचा परिणाम येत्या काही दिवसांत गव्हाच्या किंमतींवर दिसून येईल.