Health Tips | संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा ऋतू आणि विसर्गकाळातील शिशिर तसेच हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा. हिवाळा हा ऋतू पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले जाते. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे भाग असून आहार, व्यायाम, उपचार अशा प्रकारे तिन्ही बाजूंनी हिवाळ्यात आवश्यक ते बदल केले, तर हिवाळ्याचा आनंदही घेता येऊ शकतो.
हिवाळ्यामध्ये शरीरस्थ अग्नीला निसर्गतः शक्ती मिळत असते म्हणून हिवाळ्यात भूक चांगली लागते आणि पचनही व्यवस्थित होते. या ऋतूत गोड, आंबट आणि खारट चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. त्यातही मधुर रस (गोड चव) शरीराचे पोषण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याने विशेषतः या ऋतूत गोड खावे. मुख्य जेवणात धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यापासून तयार केलेले विविध प्रकार, डाळी आणि कडधान्यांपैकी मूग, तूर तर उत्तमच, परंतु हेमंत ऋतूत मसूर, मटकी तसेच प्रकृतीला अनुकूल असल्यास हरभरा, उडीद, चवळी ही कडधान्येही खाता येत असतात.
भाज्या कोणत्या खाव्यात?