Onion Rates | 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export) जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात तीव्र विरोधही दर्शवला मात्र या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, कांद्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे असं कांदा उत्पादक शेतकरी म्हणत असतानाच बीडमधून एक मन हेलावून टाकणारी बाब समोर आली आहे. बीडमधील नेकनूर येथील एका तरुण शेतकऱ्याच्या कांद्याला सोलापूरच्या बाजारसमितीत फक्त एक रुपयाचा भाव देण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्याला उरलेला कांदा हा शेतामध्येच बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेली लासलगाव बाजारसमिती ही सर्वात मोठी बाजारपेठदेखील नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही निवडक भागात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. यातच बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील तरुण शेतकरी वैभव शिंदे यांनी दोन एकरवर कांद्याची लागवड केली होती.
मात्र, जेव्हा कांदा विक्रीसाठी आला तेव्हा ते तो कांदा सोलापूरच्या बाजारपेठेत विकण्यासाठी घेऊन गेले असता तिथे त्यांच्या कांद्याला चक्क एक रुपये किलो प्रमाणे कांद्याला दर मिळाला. या अतिशय दुर्दैवी बाबीमुळे हतबल होऊन त्यांना त्यांचा उर्वरित कांदा हा शेतातील बांधावर फेकून देण्याची वेळ आली.
Onion Rates | कांद्याच्या दरांत घसरण
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातल्याने घाऊक बाजार भावात सध्या सातत्याने चढउतार होत असल्यामुळे आता किरकोळ बाजारातही कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दरम्यान, आशिया खंडातील अग्रेसर कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या सरासरी घाऊक दरांमध्ये घसरण झालेली आहे. तसेच घाऊक बाजारात कांद्याच्या घाऊक भावांत सुमारे १० टक्क्यांनी घसरण झालेली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता ही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
१ जानेवारी २०२४ रोजी नाफेडच्या मनमानी आणि लुटीच्या विरोधात नाफेड कार्यालयावर हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणा बाजार समितीमधून शेतकरी मोर्चा धडकणार असून कसमादे पट्ट्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ०७:०० वाजता हा शेतकरी मोर्चा निघणार असून कांद्याचे भरलेले ट्रॅक्टर घेऊन कांदा उत्पादक शेतकरी हे पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर धडकणार आहेत.