Suicide | बँकेची नोटीस आल्याने शेतकऱ्याने संपवलं जीवन


Suicide | सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकरी आधीच पुरते संकटात सापडलेले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. याविरोधात राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतापलेले आहेत. यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे का? असा सूर सध्या शेतकऱ्यांमधून ऐकू येत आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील 43 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (10 डिसेंबर) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आलेली आहे.

यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलेली आहे. नारायण करंगळ (43) असे आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे. पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील शेतकरी नारायण भाऊसाहेब करंगळ यांनी पेरणीसाठी पैठणच्या Bank Of Baroda बँकेकडून 4 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले होते. पण नारायण करंगळ यांचे हेच कर्ज व्याजासह 7 लाख 11 हजार 940 रूपये झाले असताना हे कर्ज भरण्याबाबत संबंधित बँकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र यावर्षी अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने पीकं देखील जगवणे अवघड झालेलं असताना अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत नारायण करंगळ यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. 

शेतकऱ्यांच्या मुद्दयावर विरोधी पक्ष आक्रमक

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यातच विरोधी पक्षाने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन पुकारलं होतं. यावेळी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, कांद्याला भाव द्यावा, तात्काळ पीकविम्याची रक्कम द्यावी अशा घोषणाही देण्यात आल्या. शेतकऱ्यांना जीव देण्यास सरकार प्रवृत्त करत आहे त्यातच एका शेतकऱ्याच्या हाती फक्त ३ रुपयाचा पीकविमा मिळाला. त्या शेतकऱ्याचा मुलगा रुग्णालयात असताना तो पीकविमा बघून त्या मुलाचा जीव गेला हा दाखला देत केवळ पीकविमा कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकार काम करताय का? असा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे.