Petrol Shortage | नविन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. संपुर्ण देशभरात संप सुरू असताना महाराष्ट्रात त्याचा मोठा परिणाम जाणवला असून ट्रकचालक संपावर गेल्याने राज्यातील भाजीपाल्याची आवक कमी झाली आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात अचानकपणे वाढ झाली. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचं दिसून आलं.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात एक नविन कायदा आणला. ज्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रकचालक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी संप पुकारत ट्रक वाहतूक बंद ठेवून केंद्र सरकारच्या नविन कायद्याचा निषेध नोंदवला. काल केंद्रातील गृहखात्याने मध्यस्थी केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे मात्र अजूनही महाराष्ट्रात या संपाचा मोठा परिणाम जाणवत आहे.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ट्रक वाहतूक बंद करण्यात आली होती. याचा परिणाम म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचीही आवक घटली. त्यामुळे अचानक भाजीपाल्याचे दर तेजीत आले. मात्र भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाला खरेदीसाठी नागरीकांची चांगलीच तारांबळ उडालेली पहायला मिळाली. ट्रक चालकांच्या संपामुळे भाजीपाल्यालादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला.
Petrol Shortage | नाशकात रातोरात भाजीपाला तेजीत
नाशिक जिल्ह्यात एकूण १७ बाजार समिती असून नाशिकमध्ये ट्रकचालकाच्या संपाचा मोठा फटका बसताना दिसला. ट्रकचालक संपावर गेल्याने याचा परिणाम नाशिकच्या बाजारांमध्येही पहायला मिळाला. ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपामुळे रातोरात भाज्यांचे दर हे जवळपास 20 ते 25 रुपये प्रति किलोने वाढल्याचे चित्र बाजारांमध्ये पहायला मिळाले. मात्र काल पासून हा संप मागे घेण्यात आला असल्याने लवकरच परिस्थिती पुर्वपदावर येईल अशी आशा सामान्य नागरिकांना आहे.
नाशकात भाज्यांचे चढते दर
नाशिकमध्ये काल बाजार समितींमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात वाटाणे- 35 ते 70(रु.), मिरची 40 ते 60, गाजर 40 ते 60, कोथिंबीर 20 ते 50, वांगे 60 ते 100, भेंडी 50 ते 70 असे दर सामान्य बाजारात मिळत होते.