Jalgaon News | ‘आवक कमी असूनही केळीच्या दरात घसरण?’; शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांवर दर पाडल्याचे आरोप


Jalgaon News | खानदेशमध्ये मागील आठवड्यात केळी दरात क्विंटलमागे पाचशे ते आठशे रुपये घसरण झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील व्यापारी लॉबी एक झाली असून त्यांनी ऐन मागणीच्या हंगामात दर पाडल्याचा आरोप केला जात आहे. मागील पाच ते सहा दिवसांत खानदेशात केळीची आवक स्थिर असून त्यात कुठलीही वाढ झाली नाही. हल्ली दररोज 16 टन क्षमता असलेल्या 65 ते 70 ट्रक केळीची आवक खानदेशात होत आहे. ही आवक जळगावातील चोपडा, जामनेर, यावल या भागात होत असून रावेर, मुक्ताईनगरमध्ये आवक कमी झाली आहे.

Agro News | केळीच्या आवकीत घट; सणासुदीमुळे उठाव कायम

पितृपक्षामुळे केळीची बाजारातील मागणी घटली

नंदुरबार मधील शहादा, तळोदा आणि धुळ्यातील शिरपूर भागात आवक फारशी नसून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरातील व्यापारी लॉबी दर पाडण्यासाठी सक्रिय झालेली आहे. ज्यामुळे केळीच्या दरात मोठी पडझड झाल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. केळीच्या दारात एकाच दिवसात 600 व नंतर आणखी घसरण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांवर दर पाडल्याचा आरोप केला जात आहे. सणासुदीचे दिवस आणि आगामी नवरात्रोत्सवामुळे केळीला खानदेशात उठाव मिळेल. परंतु राज्यात सध्या पितृपक्ष सुरू असल्याने केळीला तितकासा उठाव नाही. उत्तरेकडे केळीला मागणी असून केळी आवक खानदेशात वाढलेली नाही. त्यात दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. एका घडामागे किमान शंभर रुपयांचे नुकसान सध्या शेतकऱ्यांना सहन करावे लागते आहे.

Agro News | सोयातेलासाठी सोयाबीनच्या गाळपित वाढ; भावदरांवर परीणाम होणार?

बाजार समित्यांकडून दुर्लक्ष

सध्या चोपडा, यावल, जळगाव, जामनेर इत्यादी क्षेत्रात केळीची आवक अधिक आहे. मात्र या भागातील बाजार समित्या दरांची पडझड आणि व्यापाऱ्यांशी संगनमत यावर चर्चा करायला किंवा कारवाई करायला तयार नाहीत. आवक कमी असताना दरात घसरण कशी झाली. असा मुद्दा ही येथे उपस्थित केला जात आहे. शुल्क वसुली करून बाजार समित्या फक्त आपली कमाई करण्यात व्यस्त आहेत. त्यात केळी व्यापार थेट शिवारात होतो, ज्यामध्ये कुठलीही नोंद बाजार समित्यांकडे नसते. यामुळे या संबंधित बाजार समितीने भरारी पथके नेमून कारवाई करावी. अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांकडून केले जात आहे. (Jalgaon News)